जिल्ह्यातील अनेक केंद्रांवरील लसीकरण झाले ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:16 AM2021-04-08T04:16:44+5:302021-04-08T04:16:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यातील अनेक लसीकरण केंद्रांवरील लसींचा साठा संपला आहे. गेल्या काही दिवसांपासून लसीकरणासाठी होणारी नागरिकांच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यातील अनेक लसीकरण केंद्रांवरील लसींचा साठा संपला आहे. गेल्या काही दिवसांपासून लसीकरणासाठी होणारी नागरिकांच्या गर्दीमुळे बहुतेक लसीकरण केंद्रांवरील लसींचा साठा बुधवारी संपला आहे. त्यामुळे शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील बहुतेक लसीकरण केंद्र बंद आहेत. त्यातही कोविशिल्ड या लसीचा साठा सध्या संपला असून फक्त कोवॅक्सिन ही लस उपलब्ध आहे. त्यामुळे कोविशिल्ड ही लस देणारी केंद्रे सध्या बंद आहेत. तर जिल्ह्यासाठी साडेतीन हजार कोव्हॅक्सिनचा साठा आहे.
जळगाव जिल्ह्यात सध्या २५० पेक्षा जास्त लसीकरण केंद्रे आहेत. त्यात शासकीय लसीकरण केंद्रे, उपकेंद्रे, खासगी रुग्णालयातील केंद्रे यांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी शासनाने ४५ वर्षावरील सर्वांनाच लसीकरण करण्याचे आदेश दिले. त्यामुळे जिल्ह्यातील ४५ वर्षावरील नागरिकांनी लस घेण्यासाठी रांगा लावल्या. मात्र त्या प्रमाणात लस जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध नव्हती. प्रशासनाने तातडीने उपलब्ध असलेले लसींचे डोस सर्व लसीकरण केंद्रांना पुरवले. त्यातच शासनाकडून लस न आल्याने आता लसींचा तुटवडा जाणवु लागला आहे.
सध्या प्रशासनाकडे कोविशिल्ड या लसींचा साठा नाही. तर फक्त कोव्हॅक्सिन या लसीचा साठा आहे.
कोट - लसींचा साठा कमी आहे. त्यामुळे सध्या काही केंद्र बंद आहेत. मात्र लवकरात लवकर या लसीकरण केंद्रांनादेखील लस पुरवली जाईल. कोविशिल्डचे डोस मागवण्यात आले आहेत. लवकरच दोन्ही लसींचे डोस जिल्ह्याला मिळतील.
- अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी