लसीकरण, पोषण आहारावर विशेष लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:20 AM2021-07-07T04:20:24+5:302021-07-07T04:20:24+5:30
जळगाव: जिल्हाभरात लसीकरण अधिक प्रभावीपणे राबविण्यासह बालकांच्या पोषण आहार याबाबत अधिक प्रभावी काम करणार असल्याचा मानस जिल्हा परिषदेचे नवनियुक्त ...
जळगाव: जिल्हाभरात लसीकरण अधिक प्रभावीपणे राबविण्यासह बालकांच्या पोषण आहार याबाबत अधिक प्रभावी काम करणार असल्याचा मानस जिल्हा परिषदेचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी व्यक्त केला आहे.
डॉ. आशिया यांनी सोमवारी सकाळी तत्कालीन सीईओ डॉ. बी. एन. पाटील यांच्याकडून पदभार घेतला. सायंकाळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. डॉ. पंकज आशिया यांची नुकतीच जळगावात नियुक्ती झाली आहे. या आधी भिवंडी महापालिकेत वर्षभर आयुक्त म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. यासह मालेगाव येथे कोरोना काळात त्यांनी उत्कृष्ट सेवा दिली आहे. तसेच नाशिक येथेही त्यांनी काही काळ प्रांताधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली होती. ते २०१६ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. सोमवारी त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सर्व विभाग प्रमुखांशी ओळख परिचय करून घेतला. दुपारी त्यांच्या स्वागतासाठी जिल्हा परिषदेत गर्दी झाली होती.
योजना राबविण्यावर असणार भर
ग्रामीण भागासाठी असलेल्या सर्व योजना राबविण्यावरही आपला भर राहणार आहे. आरोग्य, शिक्षण, पोषण यावर अधिक काम करणार असून सुरुवातीला सर्व आढावा घेणार असल्याचे डॉ. आशिया यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
तत्कालीन सीईओंना निरोप
तत्कालीन सीईओं डॉ.बी.एन.पाटील यांना सायंकाळी एका सोहळ्यात निरोप देण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी के. बी. रणदिवे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी. आर. लोखंडे, डॉ. दिलीप पोटोडे, ग्रामसेवक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष संजीव निकम यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. दरम्यान, डॉ. पाटील यांची अडीच वर्षांची कारकीर्द उत्कृष्ट राहिली. अनेक पुरस्कार मिळाले असून ते अत्यंत मितभाषी व संयमी स्वभावाचे अधिकारी म्हणून बी. एन. पाटील यांची कारकीर्द राहिल्याचा सूर यावेळी मनोगतातून उमटला.