गावपुढाऱ्यांचे चक्क बिअरबार पुढे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:14 AM2021-05-01T04:14:50+5:302021-05-01T04:14:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या लसीकरणासाठी नागरिक तासन् तास रांगेत उभे राहात आहेत. मात्र, जळगाव तालुक्यातील कानळदा येथील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या लसीकरणासाठी नागरिक तासन् तास रांगेत उभे राहात आहेत. मात्र, जळगाव तालुक्यातील कानळदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर एकीकडे लसीकरणासाठी नागरिकांच्या रांगा असताना, दुसरीकडे आरोग्य केंद्रावरून काही कर्मचारी लसी घेऊन कानळदाबाहेरील एका बिअरबारच्या परिसरात इतर गावांमध्ये गाव पुढाऱ्यांच्या नातेवाईकांना लसीकरण करत असल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी उघडकीस आला आहे. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर नागरिकांनी मोठा गोंधळ केला. हा वाद वाढत असल्याने याठिकाणी पोलिसांनी मध्यस्थी करून वाद शांत केला.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाकडून लसीकरणावर भर दिला जात आहे. जळगाव शहरासह तालुक्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांवरही लसीकरणाची व्यवस्था जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली आहे. सुरुवातीला लसीबाबत नागरिकांमध्ये काही प्रमाणात संभ्रम होता. मात्र, आता ते दूर झाल्याने नागरिक स्वतःहून लसीकरणासाठी गर्दी करत आहेत. जळगाव तालुक्यातील कानळदा प्राथमिक आरोग्य केंद्रातदेखील गेल्या काही दिवसांपासून नागरिकांची लसीकरणासाठी मोठी गर्दी होत आहे. दररोज प्राथमिक आरोग्य केंद्राला ११० डोस दिले जात आहेत. मात्र, याठिकाणी दररोज तीनशेहून अधिक नागरिकांची लस घेण्यासाठी गर्दी होत आहे. शुक्रवारीही सकाळपासून प्राथमिक आरोग्य केंद्रावर नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्यातच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांकडून व्यवस्थित नियोजन केले जात नसल्याने अनेकांचे हालदेखील याठिकाणी होत आहेत.
बिअरबारसमोर लसीकरण आणि निर्माण झाला वाद
प्राथमिक आरोग्य केंद्रावर नागरिकांच्या रांगा लागलेल्या असताना, कानळद्यात गावाबाहेर असलेल्या एका बिअरबारजवळ भोकर गावातील एका पुढाऱ्याच्या कुटुंबियांना लस दिली जात असल्याची माहिती गावातील काही युवकांना मिळाली. त्यानुसार युवकांनी बिअरबारच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता, प्राथमिक आरोग्य केंद्राचे काही कर्मचारीदेखील त्याठिकाणी आढळले. यामुळे संतप्त नागरिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रावर चांगलाच गोंधळ घातला. तसेच गाव पुढाऱ्यांना लपून-छपून लसीकरण केले जात असल्याचाही आरोप नागरिकांनी यावेळी केला. नागरिकांचा गोंधळ वाढत असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रावरील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी झालेल्या गोंधळाबाबत तालुका पोलीस स्थानकाला माहिती दिल्यानंतर याठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला.
वेळेवर पकडल्याने थांबवले लसीकरण
नांदगाव येथील काही तरुणांनी दिलेल्या माहितीनुसार, बिअरबारसमोर काहीजणांना लसीकरण देण्याआधीच युवकांनी हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावरून पळ काढून आरोग्य केंद्र गाठले. याठिकाणी एका व्यक्तीला लसीकरण करण्यात आले, असा दावा युवकांनी केला आहे. इतरांनाही लसीकरण करण्यात येणार होते मात्र त्याआधीच त्याठिकाणी गोंधळ निर्माण झाल्याने इतरांना लसीकरण करता आले नाही, अशीही माहिती नागरिकांनी दिली. दरम्यान, हा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला असला, तरी याआधीही याठिकाणी असे प्रकार घडत असल्याचाही आरोप नागरिकांनी केला आहे. अनेक नागरिकांना चार-चार दिवस रांगेत उभे राहूनही लस मिळत नाही. मात्र, दुसरीकडे वशिला लावून गाव पुढार्यांना लसीकरण केले जात असल्याचाही आरोप नागरिकांनी केला आहे. कानळदा परिसरातील इतर गावांमधील अनेक गाव पुढाऱ्यांना वशिल्याने लसीकरण करण्यात आल्याचाही आरोप नागरिकांनी केला आहे. दरम्यान, वाद वाढत असल्याने पोलिसांनी याठिकाणी मध्यस्थी करून वाद शांत केला. या वादामुळे काहीकाळ लसीकरणाची प्रक्रियादेखील बंद पडली होती.
कोट..
काही नागरिकांच्या गैरसमजातून हा प्रकार घडला. संबंधित आरोग्य विभागातील कर्मचारी हे किनोद या गावाला जात होते. त्यात काही नागरिकांनी विचारपूस करण्यासाठी त्यांना त्याठिकाणी थांबवले होते. मात्र, काही नागरिकांनी याबाबत गैर अर्थ काढल्याने हा वाद निर्माण झाला. मात्र, असा कोणताही प्रकार याठिकाणी घडलेला नाही.
- एम. एन. पेशेट्टिवार, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, कानळदा