पंधरा दिवसांनी येणार लस, शुक्रवारी झाली ‘ट्रायल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:12 AM2021-01-09T04:12:35+5:302021-01-09T04:12:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाशी लढा देण्यासाठी जिल्ह्यात पंधरा दिवसांत लस उपलब्ध होणार असून, याचा ‘ड्राय रन’ अर्थात ...

Vaccine to arrive in fortnight, 'trial' held on Friday | पंधरा दिवसांनी येणार लस, शुक्रवारी झाली ‘ट्रायल’

पंधरा दिवसांनी येणार लस, शुक्रवारी झाली ‘ट्रायल’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाशी लढा देण्यासाठी जिल्ह्यात पंधरा दिवसांत लस उपलब्ध होणार असून, याचा ‘ड्राय रन’ अर्थात रंगीत तालीम शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह जिल्ह्यातील चार ठिकाणी घेण्यात आली. शासकीय महाविद्यालयात मात्र, पहाटे नियोजन नसल्याने काहीसा गोंधळ उडाला होता. प्रत्येक केंद्रांवर २५ कर्मचाऱ्यांना लस टोचण्याचे प्रात्यक्षिक करण्यात आले. जागतिक आरोग्य संघटनेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ए. एच. अझर यांनी रंगीत तालीम कशी याचे सर्व नियोजन बघून कर्मचारी प्रशिक्षित आहेत का? याची चाचपणी केली.

या ठिकाणीही झाला ‘ड्राय रन’

शिवाजीनगरातील डी. बी. जैन रुग्णालयातही सकाळी १० वाजता ‘ड्राय रन’ घेण्यात आला. याठिकाणीही प्रोटोकॉलनुसार सर्व तपासणी करण्यात आली. अधिकाऱ्यांनी या ठिकाणी पाहणी केली. यांसह जळगाव तालुक्यातील धामणगाव आरोग्य केंद्र तसेच जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी हा ‘ड्राय रन’ घेण्यात आला.

आपत्कालीन किट तयारच..

लसीकरणानंतर कोणत्या कर्मचाऱ्यांना रिॲक्शन आल्यास काय करावे याचेही सर्व नियोजन करून ठेवण्यात आले होते. यासाठी शिवाजीनगर रुग्णालयात एक आपत्कालीन किट ठेवण्यात आले होते. यात रिॲक्शनुसार औषधी ठेवलेली होती, ऑक्सिजन सिलिंडरसह बेडची व्यवस्था होती. यांसह प्रकृती गंभीर झाल्यास रुग्णवाहिका तातडीने तयारच राहील, असे हे सगळे नियोजन या ‘ड्राय रन’मध्येही करण्यात आले होते.

त्रिस्तरीय रचना...

१ निवड झालेल्या कर्मचाऱ्यांना फिजिकल डिस्टन्सिंगमध्ये उभे करण्यात आले. सुरक्षारक्षक रमेश दायमा यांनी हे नियोजन केले. कर्मचाऱ्यांचे हात सॅनिटाइज केल्यानंतर संपत मलाड यांनी कर्मचाऱ्यांचे तापमान आणि ऑक्सिजनची पातळी तपासून त्यांना टप्प्याटप्पयाने आत सोडत होते.

२ प्रतीक्षालयात नोंदणीनुसार जयश्री वानखेडे या कर्मचाऱ्यांचे आधार, पॅन यापैकी एक ओळखपत्र तपासत होत्या. त्यानंतर कोविन ॲपमध्ये कर्मचाऱ्यांची माहिती भरण्यात येत होती आणि नंतर त्यांना क्रमांक देऊन लसीकरणासाठी नेण्यात येत होते.

३ लसीकरणाच्या ठिकाणी कुमूद जवंजाळ या अन्य लसी ज्याप्रमाणे नियमित दिल्या जातात, तशी लस टोचण्याचे प्रात्यक्षिक करीत होत्या.

४ प्रात्यक्षिकानंतर कर्मचाऱ्यांना विचारणा करण्यात आली. त्यानंतर दुसरी लस कधी देणार याची माहिती देऊन नंतर निरीक्षण कक्षात पाठविले जात होते.

५ निरीक्षण कक्षात डॉ. डॅनिअल साजी हे कर्मचाऱ्यांवर निरीक्षण ठेवून होते. लस दिल्यानंतर काही त्रास होतोय का? याची विचारणा दर दहा ते पंधरा मिनिटांनी कर्मचाऱ्यांना केली जात होती.

६ अर्धा तासानंतर कर्मचाऱ्यांना बाहेर पाठविण्यात आले. यावेळी वर्षा निकम, सचिन सोळंके, यशवंत पाटील, जयकुमार वडवाल आदी कर्मचाऱ्यांनी ही प्रक्रिया पार पाडली.

स्वच्छतागृहात कर्मचारी गेल्यास काय?

लस दिल्यानंतर एखादा कर्मचारी स्वच्छतागृहात गेल्यानंतर त्या कर्मचाऱ्याला उशीर झाल्यास काय? असा प्रश्न जागतिक आरोग्य संघटनेचे सर्व्हेलियन्स वैद्यकीय अधिकारी डॉ. ए. एच. अझर यांनी कर्मचाऱ्यांना केला. याचे नियोजन नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर ज्या ठिकाणी लसीकरण झाले त्या ठिकाणी स्वच्छतागृह लांब असेल तर लक्ष ठेवण्यासाठी एक अतिरिक्त कर्मचारी या ठिकाणी नियुक्त करावा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

लस नव्हे केवळ ''ॲक्शन''

कर्मचाऱ्यांना लस टोचल्याची आम्ही केवळ ॲक्शन केली. कुणालाही कसलेच इंजेक्शन दिले गेले नाही. अद्याप लस नाही. त्यामुळे हे केवळ प्रात्यक्षिक होते, असे स्पष्टीकरण आरोग्य कर्मचाऱ्यांनी या ‘ड्राय रन’नंतर दिले.

या दिल्या सूचना...

- कर्मचाऱ्यांना एक डोस लसीचा दिल्यानंतर त्याच्या एका महिन्याने दुसरा डोस दिला जाणार आहे.

- लस दिल्यानंतरही मास्क लावणे, हात स्वच्छ धुणे आणि फिजिकल डिस्टन्सिंग यांचे पालन करायचेच आहे.

- कसला त्रास जाणवल्यास आरोग्य कर्मचाऱ्याशी तातडीने संपर्क साधायचा आहे.

पालकमंत्री आले अन् गोंधळ

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील नर्सिंग महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीत ‘ड्राय रन’ घेण्यात आला. याची पाहणी गुरुवारीच अधिकाऱ्यांनी केलेली होती. शुक्रवारी सकाळी ८ वाजेची वेळ असताना एक तास उशिराने ही रंगीत तालीम सुरू झाली. सुरुवातीला ८.४५ वाजता जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण दाखल झाले. त्यानंतर ९ वाजता अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद आले. त्यानंतर यंत्रणा कामाला लागली. आधीच उशीर झालेला होता. त्यातच अचानक पालकमंत्री गुलाबराव पाटील आल्यामुळे यंत्रणेचा गोंधळ उडाला आणि त्यावेळी तातडीने टेबल लावणे, सर्व साहित्य त्यावर ठेवणे, बॅनर लावणे, या बाबी पूर्ण करण्यात आल्या. बाहेर रांगोळी काढून सजावट करण्यात आली होती.

कर्मचारी प्रशिक्षित आहेत का?..याची चाचपणी

जागतिक आरोग्य संघटनेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ए. एच. अझर यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, प्रशासकीय अधिकारी डॉ. यू. बी. तासखेडकर, माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. समाधान वाघ, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. जयकर यांच्यासह जीएमसीच्या कक्षात पाहणी केली.

-नोंदणी कशी करतात, लस देताना तुम्ही कर्मचाऱ्यांना काय? सांगतात. कोणती ओळखपत्र तपासतात. डोस किती, इंजेक्शन किती, तुमची भूमिका काय? असे विविध प्रश्न डॉ. अझर यांनी कार्यरत कर्मचाऱ्यांना विचारून नियोजनाची माहिती घेतली. निरीक्षण कक्षातील डॉक्टरांनी नेमके काय? करायचे आहे? याची विचारणा करून कर्मचारी प्रशिक्षित आहेत काय? हे डॉ. अझर यांनी जाणून घेतले.

Web Title: Vaccine to arrive in fortnight, 'trial' held on Friday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.