लसीमुळे अंगाला नाणी, भांडी, लाकूड, चिकटणे शक्य नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:22 AM2021-06-16T04:22:03+5:302021-06-16T04:22:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना प्रतिबंधक लस पूर्णपणे सुरक्षित असून, लस घेतल्याने शरीरात चुंबकीय तत्त्व तयार होऊन भांडे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना प्रतिबंधक लस पूर्णपणे सुरक्षित असून, लस घेतल्याने शरीरात चुंबकीय तत्त्व तयार होऊन भांडे अथवा इतर वस्तू चिकटणे शक्य नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली.
कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर अंगाला भांडी, नाणी, लोखंड, लाकूड, प्लास्टिक चिकटायला लागले, असा प्रचार सुरू झाल्याने याविषयी सोमवारी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि मराठी विज्ञान परिषद यांनी अंगाला वस्तू चिकटण्यामागचे विज्ञान सांगून जिल्ह्यात सुरू असलेल्या अफवांना विश्वास ठेवू नका, असे आवाहन केले. लस घेतल्यानंतर काही दिवसांनी शरीरात मॅग्नेट सिस्टीम तयार होते व वस्तू चिकटतात, असा दावा नाशिक येथील व्यक्तीने केला. या दाव्याविषयी अंनिसच्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष प्रयोग करून दाखवीत त्यामागची चिकित्सा केली आणि शरीरात लस घेतल्यानंतर चुंबकत्व तयार होत नाही असे सांगितले. अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. दिगंबर कट्यारे व मराठी विज्ञान परिषदेचे सचिव दिलीप भारंबे यांनी काही प्रयोग करून दाखविले. यावेळी जिल्हाधिकारी राऊत यांच्यासह अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण उपस्थित होते. प्रस्तावना जिल्हा समन्वयक विश्वजित चौधरी यांनी केली.
लसीमध्ये लोखंडाला आकर्षण करणारा फेरोमॅग्नेट यासारखे कण नसतात. त्यामुळे लोखंडाला आकर्षण करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे कट्यारे यांनी सांगितले. आपल्या शरीरातून त्वचेतून घाम श्रवतो, त्यात सिबम नावाचे तेलकट, घामट द्रव श्रवतो. या द्रवातील रेणूंचा विषम पदार्थाशी संपर्क आल्यास विषम आकर्षण या वैज्ञानिक नियमानुसार हे दोन्ही विषम पदार्थ आकर्षिले जातात व बाहेरील पदार्थ घट्ट बसतो, एक बंध तयार होते. घर्षणामुळे अंगाला चिकटून राहतात, असा दावा कट्यारे यांनी केला.
लस पूर्णपणे सुरक्षित असून, लस घेतल्याने चुंबकत्व तयार होणे शक्य नसल्याचे सांगत आपला क्रमांक आल्यानंतर लस घ्यावी व कोरोनापासून बचाव करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राऊत यांनी केले. अशा अफवांनी कोणी लस घेतली नाही व त्याला कोरोना झाल्यास हा प्रकार धोकादायक ठरू शकतो, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.