१५ एप्रिलपर्यंत आधार व्हॅलिडेट करा, अन्यथा जबाबदारी निश्चित होणार!
By अमित महाबळ | Published: April 9, 2023 10:16 PM2023-04-09T22:16:48+5:302023-04-09T22:17:02+5:30
राज्यातील सर्व शाळातील विद्यार्थ्यांची नोंद एनआयसी, पुणे यांच्याकडील सरल प्रणाली स्टुडंट पोर्टलवर करण्यात येते
अमित महाबळ
जळगाव : शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिड (वैध) करण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, भडगाव, बोदवड, भुसावळ, पाचोरा, चोपडा, चाळीसगाव आणि जळगाव या तालुक्यांच्या मुख्याध्यापकांची व सर्व पर्यवेक्षीय यंत्रणेची ऑनलाईन सभा रविवारी, घेण्यात आली. शनिवार (दि.१५) पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अन्यथा संबंधितांवर जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. यावेळी शिक्षणाधिकारी विकास पाटील (प्राथमिक) व डॉ. नितीन बच्छाव (माध्यमिक) उपस्थित होते.
राज्यातील सर्व शाळातील विद्यार्थ्यांची नोंद एनआयसी, पुणे यांच्याकडील सरल प्रणाली स्टुडंट पोर्टलवर करण्यात येते. दि. ३० जून २०२२ च्या शासन निर्णयातील निर्देशांनुसार सर्व विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची अचूक नोंद स्टुडन्ट पोर्टलमध्ये करणे अनिवार्य असून, शाळेच्या जनरल रजिस्टरमध्ये आधारप्रमाणे संबंधित विद्यार्थ्यांचे नाव असावे, अशी तरतूद आहे. सतत गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत करावयाची कार्यपद्धती देखील नमूद केलेली आहे. मात्र, शाळांना वारंवार सूचना देऊन देखील विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक प्राप्त होत नाहीत किंवा प्राप्त झालेले आधार क्रमांक अपडेट होत नाहीत, असे चित्र आहे. विद्यार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी आधार अनिवार्य आहे.
इकडे लक्ष द्या..
ज्या विद्यार्थ्यांची आधार विषयक नोंद केलेली नाही, त्यांच्यासाठी १० मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ दिलेली होती. त्यानंतरही या नोंदी अपूर्ण आहेत. सन २०२२-२३ च्या संचमान्यता आधार प्रमाणित विद्यार्थी संख्येच्या आधारे करण्यात आलेल्या असून, त्या अंतरिम आहेत. शाळांना आधार व्हॅलीड करण्यासाठी ३० एप्रिल २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली असून, त्या दिवशी आधार व्हॅलिड असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अंतिम संच मान्यतेसाठी ग्राह्य धरली जाणार आहे. त्यामुळे शाळांनी आपल्याकडील इनव्हॅलिड आधार असलेल्या विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलीड करण्याची कार्यवाही कोणत्याही परिस्थितीमध्ये १५ एप्रिलपर्यंत पूर्ण करावी, असे सांगण्यात आले.
अन्यथा शिक्षक अतिरिक्त ठरणार
मुदतीत सर्व आधार व्हॅलिड झाले नाहीत, तर अनेक शिक्षक अतिरिक्त होतील. विद्यार्थ्यांना शासकीय योजनांचे लाभ मिळणार नाहीत. याची जबाबदारी संबंधितांवर निश्चित केली जाणार आहे.
नोडल अधिकारी नेमले
ज्या शाळांचे आधार मोठ्या संख्येने इन व्हॅलिड आहेत त्यांच्यासाठी नोडल अधिकारी म्हणून विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांची नियुक्ती करण्याचे देखील आदेश देण्यात आले. आधार इन व्हॅलिड असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे आधार कार्ड शाळेत जमा करावेत, ज्यांचे आधार कार्ड नाहीत त्यांचे आधार कार्ड काढण्याची प्रक्रिया मुदतीत करण्यास सांगण्यात आले आहे. बैठकीला ६६० मुख्याध्यापक उपस्थित होते.
आधार स्थिती
- जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची एकूण संख्या : ८, ३५, १९७
- आधार असलेले विद्यार्थी : ८, २८, ४६२
- आधार इन व्हॅलीड विद्यार्थी : १,५९,२१२
- आधार नसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ६७३५
आधार व्हॅलिडमध्ये सर्वात मागे असलेले तालुके
- ७० टक्के पेक्षा कमी : जळगाव, अमळनेर, बोदवड, चाळीसगाव, पारोळा
व्हॅलिडमध्ये ७० टक्के पेक्षा जास्त काम असलेले तालुके
- भुसावळ, भडगाव, चोपडा, एरंडोल, जळगाव मनपा, जामनेर, मुक्ताईनगर, पाचोरा, रावेर, यावल