‘वंदे मातरम्’ साठी 22 वर्षापूर्वी जळगावातून लढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 12:10 AM2017-08-08T00:10:53+5:302017-08-08T00:12:12+5:30
आठवणींना उजाळा : शिक्षकाचा पुढाकार
ऑनलाईन लोकमत / चुडामण बोरसे
जळगाव, दि. 7 - गेल्याच आठवडय़ात ‘वंदे मातरम्’ वरुन राज्यात मोठाच गदारोळ झाला होता. शाळांमध्ये ‘वंदे मातरम्’ सक्तीचे करण्यात यावे, यासाठी जळगाव जिल्ह्यातील संजय चौधरी या शिक्षकाने 22 वर्षापूर्वी न्यायालयीन लढा दिला होता. त्यामुळे या आठवणींना उजाळा मिळाला आहे.
एरंडोल तालुक्यातील कासोदा येथील संजय आत्माराम चौधरी असे या शिक्षकाचे नाव. राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांमधून ‘वंदे मातरम्’ सक्तीचे करावे, यासाठी त्यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात विनंती अर्ज (क्र.93/95) 26 जून 1995 केला होता. त्यावर खंडपीठाचे तत्कालीन अतिरिक्त रजिस्टार जी.डी. पारेख यांनी न्यायालयाच्या अधीन राहून शाळा व महाविद्यालयांमध्ये ‘वंदे मातरम्’ सक्तीचे करण्याचे आदेश 14 ऑगस्ट 1995 रोजी दिले होते. आजमितीस यास 22 वर्षे पूर्ण होत आहेत. यानंतर राज्याच्या तत्कालीन शिक्षण संचालकांनी 24 नोव्हेंबर 1995 रोजी शाळा आणि महाविद्यालयात ‘वंदे मातरम्’ सुरु करण्याचे आदेश बजावले होते.
या आदेशानंतर जिल्हा परिषदेतील शिक्षण समितीचे तत्कालीन सभापती पी.सी.पाटील यांनी ‘वंदे मातरम्’ सक्तीचे करण्याचे आदेश मे 2005 मध्ये दिले होते.
मुलांमध्ये लहानपणापासून देशभक्ती अंगी बाणावी आणि मातृभूमीची महती सांगणारे राष्ट्रभक्ती निर्माण करणारे ‘वंदे मातरम्’ सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये नियमित म्हटले जावे, यासाठी आपण 22 वर्षापूर्वी हा लढा दिला होता, राष्ट्रगीताबद्दल प्रत्येकाला अभिमान असायलाच हवा. आणि तो वेळोवेळी व्यक्त व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
अशी सुचली कल्पना
आकाशवाणीवर रोज पहाटे दिवसाची सुरुवात ही ‘वंदे मातरम्’ या गीताने होत असते. मग शाळांमधून हे गीत का म्हटले जाऊ नये, असा विचार मनात आला. यासाठी आपण उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र या आदेशाची अंमलबजावणी मात्र होत नाही. 15 ऑगस्ट 2017 पासून शाळा व महाविद्यालयात ‘वंदे मातरम’ सक्तीचे करावे. - संजय आत्माराम चौधरी