प्रत्येक गावात साकारणार वनराई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 12:13 PM2019-06-05T12:13:17+5:302019-06-05T12:13:47+5:30
प्लॅस्टीक बंदीवर देणार भर
जळगाव : पर्यावरणाचा समतोल हाच खरा शाश्वत विकास आहे, त्यासाठी अधिकाधिक वृक्षलागवड व्हावी, यासाठी आता प्रत्येक गावात वनराई साकारण्याची संकल्पना साकारणार आहोत़ यासाठी मनरेगा अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला तीन वर्षांपर्यंत वृक्षसंगोपनाचे वेतनही दिले जाईल, यासह प्रत्येक ग्रामपंचयातीने प्लास्टीक बंदीवर भर द्यावा, अशा सूचना देण्यात आल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा पर्यावरण विभागाचे तत्कालीन संचालक डॉ़ बी़ एऩ पाटील यांनी सांगितले़ पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी ही माहिती दिली़
भौतिक विकास कितीही साधला तरी तरी पर्यावरणाची संसाधने, स्त्रोत यांचा समतोल जोपर्यंत राखला जात नाही तोपर्यंत हा भौतिक विकास हा शाश्वत नसेल़
यासाठी पर्यावरणाचे संवर्धन हाच शाश्वत विकासाचा मार्ग आहे़ शासनाच्या उपयायोजना आहेतच मात्र ही एक लोकचळवळ व्हावी, जंगल वाचविण्यासाठी लोकांनी जागृत होऊन चळवळ सुरू करावी, जंगल वाचले तर नदी, नाल्यांना बारमाही पाणी येईल, जलस्त्रोत आटणार नाही़ यासाठी लोकचळवळ महत्त्वाची आहे़ पाण्याचे शाश्वत साठे तयार होणे गरजेचे आहे़ त्याशिवाय शाश्वत विकास शक्य नाही़, असेही सीईओ डॉ़ पाटील यांनी सांगितले़
सेंद्रीय शेतीकडे वळावे
पिंकावर फवारण्यात येणाऱ्या किटकनाशकांच्या वापरात समतोल हवा, यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे़ पेस्टीस्टाईड मुळे जलप्रदुषण तर होते, भाजीपाल्यावरही परिणाम होतो, यामुळे आरोग्याचाही गंभीर प्रश्न समोर येऊ लागला आहे़ जमिनही नापिक होते़ त्यामुळे सेंद्रीय शेतीकडे वळणे ही काळाची गरज आहे़ अनेक राज्यांमध्ये पूर्णत: सेंद्रीय शेती केली जाते़
ग्रामपंचायतींना सूचना
आपल्या गावात प्लॅस्टीक पिशव्या तसेच अन्य वस्तूंवर बंदी आणण्यासंदर्भात पंधरा दिवसांपूर्वीच सर्व ग्रामपंचातींना सूचना देण्यात आलेल्या आहेत़ या व्यतिरिक्त गावात कमीत कमी ५० टक्के शोषखड्डे करावे, जेणेकरून भूजल पातळीत वाढ होईल, रेनवॉटर हार्व्हेस्टींगसाठी प्रयत्न होणे गरजेचे असून यासंदर्भातही ग्रामपंचायतींना कळविण्यात आले आहे़ घनकचºयावर प्रक्रिया करून त्यापासून खतनिर्मिती करण्यासह अजैविक कचरा निर्माण होणाºया प्लास्टीकवर पूर्णत: बंदी आणण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत़ यात लोकसहभागाला अधिक महत्त्व असल्याचे डॉ़ बी़ एऩ पाटील यांनी सांगितले़