६६० मेगाव्हॅट क्षमतेच्या वीज प्रकल्प संचाचे 'बाष्पक प्रदिपन' यशस्वी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 07:58 PM2023-03-30T19:58:43+5:302023-03-30T20:02:15+5:30
दीपनगर प्रकल्पात सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित यंत्रणा कार्यान्वीत
कुंदन पाटील
जळगाव : दीपनगर महानिर्मितीच्या वीज प्रकल्पात ६६० मेगाव्हॅट स्थापित क्षमतेच्या सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित संच क्रमांक ६ चे 'बाष्पक प्रदीपन' ३० मार्च २०२३ रोजी सकाळी संचालक(प्रकल्प) अभय हरणे यांच्या हस्ते नियंत्रण कक्षातून कळ दाबून यशस्वीरीत्या बाष्पक प्रदिपन पूर्ण करण्यात आले. यावेळी मेसर्स भेल कंपनीचे महाव्यवस्थापक दिनेश जवादे, वीज केंद्राचे मुख्य अभियंता विवेक रोकडे, मोहन आव्हाड उपस्थित होते.
महानिर्मितीचा ६६० मेगावाट क्षमतेचा हा चवथा संच आहे. यापूर्वी कोराडी येथे प्रत्येकी ६६० मेगावाटच्या तीन संचांतून वीज उत्पादन सुरू आहे. चंद्रपूर २९२० मेगावाट, कोराडी २१९० मेगावाट नंतर आता भुसावळ १८७० मेगावाट हे महानिर्मितीचे तिसरे मोठे वीज उत्पादन केंद्र म्हणून साकारणार आहे. २० फेब्रुवारी २०२३ रोजी महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ.पी.अन्बलगन यांनी प्रकल्प स्थळी पाहणी करून प्रगतीपर कामांचा आढावा घेतला होता आणि बैठक घेऊन कामांना अधिक वेग देण्याचे निर्देश दिले होते. बाष्पक प्रदिपनप्रसंगी उप मुख्य अभियंते आर.एम. दुथडे, संतोष वकरे, प्रशांत लोटके, मनोहर तायडे, अधीक्षक अभियंते महेश महाजन,किशोर शिरभैय्ये, मनिष बेडेकर,योगेश इंगळे,पराग आंधे, राजु अलोने,सुमेध मेश्राम,सुनील पांढरपट्टे, महेंद्र पचलोरे,अतुल पवार, एस. एस. देशपांडे, कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ राजेश चिव्हाणे,कल्याण अधिकारी पंकज सनेर, सुधाकर वासुदेव प्रामुख्याने उपस्थित होते.