वरगव्हाणला 50 जणांना अतिसाराची लागण
By admin | Published: May 28, 2017 12:32 PM2017-05-28T12:32:54+5:302017-05-28T12:32:54+5:30
वैद्यकीय पथक दाखल : पाण्याचे नमुने घेतले
Next
ऑनलाईन लोकमत
बिडगाव, जि.जळगाव,दि.28- दूषित पाणी पुरवठय़ामुळे वरगव्हाण (ता.चोपडा) येथील जवळपास 50 ते 60 जणांना अतिसाराची लागण झालेली आहे. रूग्णांवर जिल्हा परिषदेच्या शाळेत तातडीने उपचार सुरू आहे. या गावाला गटविकास अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिका:यांनी रविवारी सकाळी भेट देवून परिस्थितीची पहाणी केली.
वरगव्हाण येथे दूषित पाणी पुरवठय़ामुळे शनिवारपासूनच काहींना उलटय़ा व संडासचा त्रास होऊ लागला होता. गावात अतिसाराची लागण झाल्याचे धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्राला कळविण्यात आले. त्यानुसार आरोग्यसेवक जे.वाय.पाटील बी.एस. सोनवणे व भिकुबाई बोदळे हे हजर होवून त्यांनी मध्यरात्री दीड वाजेर्पयत ग्रामपंचायत कार्यालयातच रूग्णांवर उपचार केले.
दरम्यान, गावात अतिसाराची लागण झालेल्या रूग्णांची संख्या वाढतच आहे. चार वैद्यकीय अधिका:यांचे पथक गावात दाखल झाले असून, त्यांनी रूग्णांवर उपचार सुरू केले आहे. या रूग्णांना जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत सलाईन लावण्यात आलेल्या आहेत.
जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती दिलीप पाटील हे वरगव्हाणलाच थांबून आहेत. तर रविवारी सकाळी गटविकास अधिकारी ए.जे.तडवी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रकाश लोमटे यांनीही भेट देत रूग्णांची पहाणी केली. दरम्यान पाण्याचे नमुने घेण्यात आले असून, ते तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश लोमटे यांनी दिली.