वरणगाव न.पा.तर्फे वाढीव पाणीपुरवठा योजनेला मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 11:41 PM2018-08-07T23:41:23+5:302018-08-07T23:45:40+5:30
जळगाव जिल्ह्यातील वरणगाव येथील नगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत शहराचा वाढीव विस्तार आणि लोकसंख्या लक्षात घेऊन वाढीव पाणी पुरवठा योजनेला मंजुरी देण्यात आली आहे.
आॅनलाईन लोकमत
वरणगाव, ता. भुसावळ : नगर पालिकेच्या स्थायी समितीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत शहराचा वाढता विस्तार आणि लोकसंख्येला समोर ठेवून वाढीव पाणी पुरवठा योजनेला मंजुरी देण्यात आली आहे.
नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. बैठकीत वरणगाव शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. सद्यस्थितीत असलेल्या पाणीपुरवठा योजनेवर ताण येतो, म्हणून नवीन वाढीव पाणीपुरवठा योजना तयार करून नवीन पाईपलाईन व नारी मळा येथे नवीन पाणी टाकी उभारणे तसेच विस्तारित भागात नवीन टाक्या बांधणे आणि जलशुद्धीकरण योजनेच्या यंत्रणेत सुधारणा करणे, तसेच नवीन पाईप लाईन टाकणे, व संपूर्ण शहरात भूमिगत गटारी त्याचबरोबर रस्ते आणि घनकचरा प्रकल्प उभारण्याचा निर्णय झाला. प्रकल्प सल्लागारही नेमण्याचा प्रस्ताव तत्काळ तयार करून शासनाकडे पाठविण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. संपूर्ण शहरात केंद्र सरकारच्या योजनेतून ईसीएल एलईडी लाईट बसविण्याचा प्रस्ताव तयार करून त्याच्यावर कार्यवाही करण्याचेही यावेळी ठरविण्यात आले. बैठकीला उपनगराध्यक्ष शेख आखलाक शेख युसुफ, सभापती माला मेढे, शशी कोलते, नासरीनबी साजिद कुरेशी, संजीव माळी , दीपक भंगाळे उपस्थित होते.
दीपनगर प्रकल्पामुळे होणाऱ्या प्रदुषणावर उपाय
शासनाच्या नावीन्यपूर्ण योजनेतून संपूर्ण शहरात सीसीटीव्ही यंत्रणा बसवणे, नगरपरिषद इमारतीत सौर ऊर्जेवर यंत्रणा चालवण्यासाठी निधीच्या मागणीचा प्रस्ताव तयार करण्यावरही स्थायी समितीच्या सभेत चर्चा करण्यात आली. तसेच दीपनगर वीजनिर्मिती केंद्रातून होणारे प्रदूषण तत्काळ थांबवणे व वरणगाव शहरात जे प्रदूषण होत आहे. त्यावर उपाययोजना करून सीएसआर निधी वरणगाव शहरासाठी देण्यात यावा, अशा मागणीचा ठरावही यावेळी करण्यात आला.