डबक्यांमध्ये गप्पी मासे सोडण्यासह विविध उपाययोजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:12 AM2021-06-11T04:12:01+5:302021-06-11T04:12:01+5:30

चुंचाळे (ता. यावल) : जागतिक महामारी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी लढा देत असताना पावसाळा सुरू होत आहे. पावसाळ्यात कीटकजन्य ...

Various measures including releasing guppy fish in puddles | डबक्यांमध्ये गप्पी मासे सोडण्यासह विविध उपाययोजना

डबक्यांमध्ये गप्पी मासे सोडण्यासह विविध उपाययोजना

googlenewsNext

चुंचाळे (ता. यावल) : जागतिक महामारी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी लढा देत असताना पावसाळा सुरू होत आहे. पावसाळ्यात कीटकजन्य व जलजन्य आजारही उद्भवत असतात. याची दखल घेत हिवतापविषयी जनतेमध्ये जनजागृती उपाययोजना तालुक्यात केली जात आहे.

कीटकजन्य व जलजन्य आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य विभाग व आरोग्यसेवक सज्ज झालेला आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार व जिल्हा हिवताप अधिकारी अपर्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात, तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हेमंत बऱ्हाटे व यावल - रावेरचे तालुका हिवताप पर्यवेक्षक विजय नेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली यावल तालुक्यात १ ते ३० जून २०२१ यादरम्यान हिवताप प्रतिरोध महिना साजरा करून जनजागृती करण्यात येत आहे.

या अनुषंगाने प्राथमिक आरोग्य केंद्र सावखेडासिमच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नसीमा तडवी, डॉ. गौरव भोईटे, आरोग्य सहायक एल. जी. तडवी प्रयोगशाळा तंत्रज्ञ कल्पेश पाटील, आदी सावखेडासिम प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील उपकेंद्रात व गावात आरोग्यसेवक हे सर्वेक्षण व जनजागृती करीत आहेत.

दहिगाव येथे राजेंद्र बारी, सावखेडासिम येथे संजय तडवी, मोहराळा येथे बालाजी कोरडे, सातोद, व कोळवद येथे भूषण पाटील, तर आदिवासी व अतिदुर्गम भागात सातपुड्याच्या पायथ्याशी बसलेले गाड्र्या - जामन्या येथे अरविंद जाधव हे सर्व आरोग्यसेवक, आशासेविका या प्रत्येक गावात कंटेनर सर्वेक्षण, डास उत्पत्ती स्थानात गप्पी मासे सोडणे, ग्रामपंचायतीकडून गटारी वाहत्या करणे, पाण्याची डबकी बुजविणे किंवा वाहती करणे किंवा क्रुड ऑईल टाकणे, प्रत्येक आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळणे, माहिती पत्रके वाटणे, भिंतीवर म्हणी लिहिणे, तापाच्या रुग्णाचे रक्त नमुने घेऊन औषध उपचार देणे, गट सभा घेऊन नागरिकांना आरोग्य शिक्षण देणे, आदी प्रकारे हिवताप, डेंग्यू, व चिकुनगुण्या या कीटकजन्य आजारांना प्रतिबंधात्मक करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

जनतेचा सहभाग व दरवर्षी आरोग्य कर्मचारी घेत असलेल्या मेहनतीमुळे हिवताप रुग्ण शून्यावर आलेले आहेत, असे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले.

डॉ. नसिमा तडवी, शोभा चौधरी, राजेंद्र बारी, संजय तडवी आदी गप्पी मासे सोडताना.

Web Title: Various measures including releasing guppy fish in puddles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.