धरणगावातील विविध कामे बोगस आणि नियमबाह्य, बिलं काढू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:19 AM2021-07-07T04:19:44+5:302021-07-07T04:19:44+5:30
दरम्यान, या तक्रारी अर्जाची एक प्रत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनादेखील पाठविण्यात आली आहे. महाजन यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेल्या ...
दरम्यान, या तक्रारी अर्जाची एक प्रत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनादेखील पाठविण्यात आली आहे. महाजन यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, धरणगाव शहरातील विविध भागात पेव्हर ब्लॉकची कामे चालू आहेत. या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार होत आहे. तसेच शहरातील प्रास्ताविक भुयारी गटारी आणि पाईपलाईनची कामे लक्षात घेता पेव्हर ब्लॉकवरील खर्च म्हणजे जनतेच्या पैशांचा अपव्यय आहे. वास्तविक बघता धरणगाव मुख्याधिकाऱ्यांनीदेखील २ फेब्रुवारीला झालेल्या सभेच्या टिप्पणीत पेव्हर ब्लॉक बसवताना आणि काँक्रिटीकरण करताना निधीचा अपव्यय होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे नमूद केले आहे. त्यामुळे आपण याबाबत तत्काळ ३०८ प्रमाणे ठराव रद्द करण्यासाठी धरणगाव मुख्याधिकारी यांना आदेश द्यावेत. तसेच याबाबत जिल्हाधिकारी म्हणून आपण कायदेशीर आदेश देत नाहीत, तोपर्यंत धरणगावातील शहरातील पेव्हर ब्लॉकची ठेकेदाराची बिले काढू नयेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
धरणगाव शहरातील बेलदार मोहल्ल्याजवळील शौचालय बांधकामात मोठ्या प्रमाणात अनियमितता होत आहे. अंदाजपत्रकाप्रमाणे कामे होत नसून बांधकामाचे साहित्य निकृष्ट दर्जाचे होत आहे. त्यामुळे या शौचालयाच्या बांधकामाची आपण प्रत्यक्ष तसेच तक्रारदार म्हणून आमच्या समक्ष थर्डपार्टी ऑडिटर, पालिकेचे अभियंत्यांना आदेश देऊन कामाची तत्काळ पाहणी करावी. जोपर्यंत थर्डपार्टी ऑडिटर आणि पालिकेचे इंजिनिअर येऊन पाहणी करत नाही तसेच आपण अहवाल देत नाहीत, तोपर्यंत हे बांधकाम तातडीने थांबवण्यात यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
चौकट
शहरातील झुमकराम वाचनालयाचे काम बोगस होत आहे. तसेच याठिकाणी मोठ्या प्रमाणात शासनाची दिशाभूल करून जागा पलीकडे वर्ग करण्यात आली आहे. झुमकराम सार्वजनिक वाचनालयाला परवानगी देताना तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या अटी-शर्थीच्या अधीन राहून परवानगी दिली होती, त्यातील पहिल्याच अटीचे उल्लंघन झाले आहे. त्यानुसार जागेचा वापर फक्त वाचनालयासाठी करण्याची अट तत्कालीन जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी घातली होती. त्यामुळे वाचनालयासोबत शॉपिंग कॉम्प्लेक्स कसे बांधले जातेय? असा प्रश्न निवेदनात करण्यात आला आहे.