साकळीचा वारकरी 30 वर्षापासून विठ्ठलाच्या दारी
By Admin | Published: June 24, 2017 04:22 PM2017-06-24T16:22:52+5:302017-06-24T16:22:52+5:30
सुपडू तेली यांच्याकडे राममंदिर संस्थान जळगावचे चोपदारची जबाबदारी
ऑनलाईन लोकमत
साकळी,ता.यावल, दि.24 - येथील सुपडू दामू तेली हे गेल्या 30 वर्षापासून पंढरपूर येथे राममंदिर संस्थान, जळगाव या दिंडीत पायी जात आहे. गेल्या 1987 पासून अखंडीतपणे ते पायी दिंडीत सहभागी होत आहे. संस्थानतर्फे पायी वारी दरम्यान दिंडीचे चोपदारची जबाबदारी देण्यात आली आहे.
सुपडू तेली यांनी 1987 पासून लक्ष्मण ठाकूर यांच्या सहयोगाने राममंदिर संस्थान जळगाव येथून पायी वारीस सुरूवात केली. लक्ष्मण ठाकूर हे दिंडीचे चोपदार होते परंतु त्यांचे निधन झाल्यानंतर ही जबाबदारी साकळीचे सुपडू तेली यांच्याकडे आली आणि ते ही जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडत आहे.
सुपडू दामू तेली अत्यंत गरीब कुटुंबातील आहे आणि 30 वर्षापासून पायी दिंडीत सहभागी आहेत. वटसावित्री पोर्णिमेनंतर या वारीस जळगाव येथून प्रारंभ होतो व आषाढी एकादशीला ही राममंदिर संस्थानची दिंडी पंढरपूर येथे कामारवाडा मुक्ताई संस्थान वाडा (मठात) पोहोचते तेथून दर्शनानंतर परतीचा प्रवास सुरू होतो.
या पायी दिंडीस जाण्यासाठी एक महिना व परतीसाठी एक महिना लागतो. ठिकठिकाणी दानशूर व्यक्ती दिंडीस जेवणाची व मुक्कामाची सोय करतात. रात्री मुक्काम ठिकाणी भजन, कीर्तन, प्रवचनाचे आयोजन केले जाते. विठ्ठलाचे नाममुखी घेत जयघोष करत वारकरी पंढरपूरकडे प्रयाण करतात.
सुपडू तेली हे पंचक्रोशीत ‘हरी हरी’ म्हणून त्याची ओळख आहे. ते प्रत्येक भेटणा:या माणसाला हरी हरी म्हणतात. त्यांनी अनेकांना भक्ती मार्गाला लावून वारीत पंढरीला नेले. त्यांच्यासोबत गावातून काशिनाथ गुलाब लोधी पायी वारीस जात आहे. नारायण न्हावी, गणेश धोबी हे सहभागी होवून गेले आहे.