वरुणराजाची कृपा सात तालुके शतकाच्या उंबरठ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 12:07 PM2019-09-11T12:07:48+5:302019-09-11T12:10:49+5:30
अमळनेर व एरंडोलला झोडपले
जळगाव : गणेशोत्सवाच्या पर्वात वरूणराजाने जिल्हाभरात सलग दोन दिवस दमदार हजेरी लावली़ सोमवारी जिल्हाभरात ४११ मिमी पाऊस झाला़ अमळनेर व एरंडोल तालुक्याला पावसाने झोडपून काढले या ठिकाणी सर्वाधिक पावसाची नोंद आहे़ या वर्षी यावल व रावेर तालुक्याने शंभरी पार केली असून सात तालुके शतकाच्या उबंरठ्यावर आहेत़
या वर्षी सुरवातील दडी मारलेल्या पावसाने नंतर जिल्हाभरात दमदार हजेरी लावली़ धरणांमधील पाणी साठा झपाट्याने वाढल्याने पाण्याचा बिकट प्रश्न मिटल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असून वरूणराजाच्या कृपेने बळीराजा सुखावला आहे़ रविवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर सोमवारी एरंडोल तालुक्यात ५८़ ३ मिमी पावसाची नोंद झाली़ त्या खालोखाल अमळनेरमध्ये ५५़८ मिमी पाऊस झाला़ पाचोरा, रावेर, बोदवड, भुसावळ जळगावला कमी अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली़ सरासरीत यावल १०४ मिमी तर रावेल तालुक्यात ११३़ ८ मिमी, यानंतर मुक्ताईनगर ९९़ ८ मिमी, एरंडोल ९९़ ८, भुसावळ ९९़ १, अमळेर ९७़ ५, चोपडा ९६़६, जामनेर ९५़५, बोदवड ९४़७ हे तालुके शंभरीच्या उंबरठ्यावर आहेत़
गिरणा दुथडी वाहू लागल्याने परिसरात उत्साह
पावसामुळे रात्री पासून गिरणा नदी दुथडी भरुन वाहत असल्याने परिसरातून समाधान व्यक्त होत आहे.नदी पाात्रात मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने गणेश भक्तांमध्ये आनंद व्यक्त होत आहे़ पुढील दोन दिवसात गणेशाचे विसर्जन होणार आह़े गिरणा नदी दुथडी भरून वाहू लागल्याने सर्वच मंडळाना सावध होऊन गिरणा पात्रात विसर्जन करावे लागणार आहे़
दापोरा बंधारा ओसंडून वाहू लागला
पावसामुळे दापोरा, कांताई, लमांजन हे सर्व बंधारे पूर्ण भरून वाहत आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी पातळी वाढणार आहे. त्यामुळे आगमाी काळातील गावांचा पाणीप्रश्न सुटणार आहे़ जळगाव जिल्ह्यातील निम्मे गावासह चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल यासारख्या मोठ्या शहराचा भविष्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे .