तापी पूर्णा नद्यांचा अफाट जलसागर पर्यटकांना खुणावतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2020 05:07 PM2020-11-10T17:07:11+5:302020-11-10T17:09:09+5:30
मंदिर बंद असल्याने पर्यटक व भाविक ह्या पवित्र व निसर्गरम्य अफाट जनसागराच्या भेटीपासून वंचित राहत आहेत.
मनीष चौधरी
चांगदेव, ता.मुक्ताईनगर : जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव हे गाव तापी-पूर्णा या पवित्र नद्यांच्या संगमासाठी व चांगदेव महाराजांच्या हेमाडपंथी भव्य मंदिरासाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रात चांगला पाऊस झाल्याने नद्यांच्या जलपातळीत कमालीची वाढ झालेली आहे. त्यात भर म्हणजे या नद्यांवर पुढे हतनूर धरण असल्याने पाणी अडविण्यात आल्याने चांगदेव येथील संगम स्थळावर अफाट जल सागराचे मनमोहक, सुंदर मनाला आकर्षित करणारे दृश्य पर्यटकांना खुणावत आहे. परंतु मंदिर बंद असल्याने पर्यटक व भाविक ह्या पवित्र व निसर्गरम्य अफाट जनसागराच्या भेटीपासून वंचित राहत आहेत.
दरवर्षी लाखो भाविक व पर्यटक या ठिकाणाला भेट देतात. नौकाविहाराचा आनंद घेतात व मनाला प्रफुल्लित करून आलेला थकवा मिटवतात. परंतु यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे मंदिर परिसर मनुष्यविरहित दिसत आहे.
चांगदेव महाराज मंदिर बंदच
चांगदेव येथील चांगदेव महाराज मंदिर हेमाडपंथी बांधकामासाठी प्रसिद्ध आहे. वारकरी संप्रदाय मोठ्या भावभक्तीने या ठिकाणी येत असतात. तसेच वर्षभर पर्यटक सुद्धा मोठ्या संख्येने येत असतात. हे मंदिर सहा महिन्यांच्या रात्रीत बांधल्याची आख्यायिका प्रसिद्ध आहे . हे मंदिर गेल्या सात महिन्यांपासून बंद असून भाविक व पर्यटकांची वर्दळ बंद आहे.
दगडी कलात्मक वस्तूंची निर्मिती सुरू
चांगदेव महाराज मंदिर पुरातत्व विभाग औरंगाबाद यांच्या ताब्यात असून या ठिकाणी सध्या मंदिर परिसरात पडलेल्या, तुटलेल्या, मोठमोठ्या दगडांपासून सुंदर कलात्मक वस्तू बनविण्यात येत आहे. यात पर्यटकांना बसण्यासाठी दगडी बेंच, पादत्राणे ठेवण्यासाठी दगडी कपाट, एवढेच नाही तर आकर्षक कचराकुंड्यासुद्धा दगडीच बनवल्या जात आहे. पर्यटकांना दगडी वस्तू एक आकर्षण ठरणार आहे.