नगरदेवळा येथील शाहीर शिवाजीराव पाटील यांना वसुंधरा पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 03:09 PM2017-12-02T15:09:46+5:302017-12-02T15:14:23+5:30
‘जळगाव फर्स्ट’चाही होणार गौरव. बाळकृष्ण देवरे, इम्रान तडवी व अजय पाटील यांना वसुंधरा मित्र
आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.२ : वसुंधरा चित्रपट महोत्सवानिमित्ताने वसुंधरा सन्मान व वसुंधरा मित्र पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. त्यात नगरदेवळा येथील शाहीर शिवाजीराव पाटील यांना वसुंधरा सन्मान तर निसर्ग संवर्धन चळवळीतील तरुण कार्यकर्ते बाळकृष्ण देवरे, इमरान तडवी आणि अजय पाटील यांना वसुंधरा मित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
शाहीर शिवाजीराव पाटील आपल्या कला पथकाच्या माध्यमातून ग्रामीण आणि नागरी भागात पर्यावरण आणि निसर्ग संवर्धनासाठी गेल्या २५ वर्षापासून सातत्याने कार्य करीत आहेत. पर्यावरणाचा जागर हा त्यांचा पोवाडा अवघ्या महाराष्टÑात गाजला आहे. बाळकृष्ण देवरे वन्यजीव संरक्षण संस्थेच्या माध्यामातून वनसंवर्धनासाठी व्यापक कार्य करीत आहे. विशेषत: सर्पमित्रांच्या चळवळीला त्यांनी रचनात्मक कार्य केले आहे. जळगाव शहरामध्ये वृक्षतोडीला प्रतिबंध घालण्यासाठी त्यांचे उल्लेखनीय योगदान राहिले आहे.
इम्रान तडवी अग्नीपंख या संस्थेच्या माध्यमातून पक्षी संवर्धनाचे कार्य करीत आहेत ते खगोल अभ्यासकही आहे. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांचे प्रबोधन करणे, शिबिरांचे आयोजन करणे आदी उपक्रमांचे ते गेल्या ८ वर्षापासून कार्य करीत आहे.
अजय पाटील यांनी मु.जे.महाविद्यालयामध्ये नेचर क्लबची स्थापना केली. निसर्ग संवर्धनासाठी त्यांनी तालुका स्तरावर विद्यार्थी युवकांची शृंखला उभी केली आहे. हे युवक ग्राम पातळीवर जाऊन निसर्ग संवर्धनाविषयी जनजागृतीचे कार्य करीत असतात. वसुंधरा महोत्सवात या व्यतिरिक्त दिले जाणारे ग्रीन टिचर्स पुरस्कार अनिल माळी, विशाल सोनकुळ, राहुल सोनवणे, सुनीता महाजन, प्रशांतराज तायडे यांना देण्यात येणार आहे.
जळगाव फर्स्ट संस्थेलाही पुरस्कार
जळगाव शहरात स्वच्छता अभियानात उल्लेखनीय कार्य करणाºया जळगाव फर्स्ट या संस्थेला यावर्षीचा वसुंधरा संस्था पुरस्कार देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे निसर्ग पर्यटनासाठी देण्यात येणारा पुरस्कार आर्यन फार्मच्या संचालिका डॉ.रेखा महाजन यांना देण्यात आला आहे.