शास्त्रवचनानुसार वटपौर्णिमा व्रत बुधवारीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 12:22 PM2018-06-26T12:22:05+5:302018-06-26T12:24:10+5:30
सूर्योदयानंतर दुपारी दीड वाजेपर्यंत वटपूजन करावे
प्रसाद धर्माधिकारी
नशिराबाद, जि. जळगाव : पतीस दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य लाभावे व जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी विवाहित महिला वटपौर्णिमा व्रत करतात. ज्येष्ठ पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. यादिवशी वडाच्या वृक्षाचे पूजन व उपवासाला अनन्य महत्त्व आहे. मात्र यंदा वटसावित्री पौर्णिमा बुधवारी की गुरुवारी हा थोडा संभ्रम निर्माण झाला असला तरी २७ जून रोजी बुधवारीच वटपौर्णिमा साजरी होत आहे.
बुधवारी सकाळी ८ वा. १२ मिनिटांपर्यंत चतुर्दशी असून त्यानंतर पौर्णिमेस प्रारंभ होत आहे. व गुरुवारी सकाळी १० वा.२३ मिनिटापर्यंत पौर्णिमा आहे. सूर्यास्तापूर्वी ६ घटीपेक्षा अधिक व्यापिनी अशा चतुर्दशीयुक्त असलेल्या पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीव्रत (वटपूजन) करावे, असे शास्त्रवचन आहे. त्यामुळे दि.२७ रोजी बुधवारी चतुर्दशी ८ वा.१३ मी.पर्यंत असल्याने याच दिवशी पौर्णिमा तिथी सायंकाळी ६ घटीपेक्षा अधिक असल्याने बुधवारीच वटपौर्णिमा पूजन व उपवास करावा. बुधवारी सकाळी चतुर्दशी तिथी असली तरी सूर्योदयानंतर मध्यान्हापर्यंत म्हणजे दुपारी सुमारे दीड पर्यंत कोणत्याही वेळी वटपूजन करावे असा खुलासा दाते पंचांगात दिलेला आहे.
वटवृक्षाचे यादिवशी महिला सुत गुंडाळून पूजन करतात. ऋतुफल व धान्यासह सौभाग्य वाटान अर्पण करतात.
पवित्र वटवृक्षाचे आयुष्य जास्त असून पारंब्यांनी त्याचा विस्तारही खूप होतो. अशा वटवृक्षाचे पूजन करीत पतीस दीर्घायुष्य, आरोग्य व सुखसमृद्धीची प्रार्थना करण्यात येते. कथा वाचन व उपवास केला जातो.
फांदी तोडून पूजन करणे टाळा
मूळासकट असलेल्या वृक्षाचे पूजनाला अनन्य महत्त्व आहे. वटवृक्षाची फांदी तोडून घरी आणून पूजन करू नये. वडाच्या झाडाजवळ जावून पूजन करणे शक्य नसल्यास त्यापेक्षा मूळासकट असलेल्या वटरोपाचे घरी आणून पूजन करून त्याची लागवड करीत संवर्धन करा. मात्र फांदी तोडून पूजन करणे टाळा.
व्रताची आख्यायिका
सावित्री अश्वपतीची कन्या आहे. ती सत्यवानाला पती म्हणून निवडते. तो अल्पायुशी असल्याची भविष्यवाणी नारदमुनी वर्तवतात. मात्र सावित्री हे माहीत असताना सत्यवानाशी विवाह करते. त्याच्या मृत्यूची वेळ येऊन ठेपते. वटवृक्षाखाली त्याला मृत्यू येतो. यमराज सत्यवानाचे प्राण नेऊ लागला. सावित्री यमाच्या मागे पतीबरोबर जावू लागली. पतीसोबत जाण्याचा हट्ट धरला. अखेर यमाने प्रसन्न होत तिला वर मागण्यास सांगितले व सावित्रीने तीन वर मागितले. सासू-सासऱ्यांची दृष्टी व राज्य परत मागितले व पुत्र व्हावा असा वर मागितला. यमराजाने तथास्तू म्हटले. सावित्री वटवृक्षाजवळ येते. सत्यवानाच्या शरीरात पुन्हा प्राण आलेले असतात. सावित्रीचे सौभाग्य टिकून राहते व ती अखंड सौभाग्यवती बनते अशी अख्यायिका आहे. त्यामुळे ज्येष्ठ पौर्णिमेला वडाच्या वृक्षाचे पूजनाला महत्त्व आहे. सावित्रीसह ब्रह्मा ही या व्रताची देवता आहे.