जळगावात होणाऱ्या पर्यावरण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी वीणा गवाणकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 05:27 PM2017-11-17T17:27:37+5:302017-11-17T17:47:49+5:30
जळगावात १० डिसेंबर रोजी पर्यावरण साहित्य संमेलनाचे आयोजन
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि.१७ : समर्पण संस्था संचालित पर्यावरण शाळेतर्फे जळगाव येथे १० डिसेंबर रोजी होत असलेल्या पर्यावरण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निसर्ग लेखिका वीणा गवाणकर यांची निवड केली आहे.
जैन उद्योग समूह आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने पुरस्कृत केले आहे. साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी त्यांची प्रकट मुलाखत घेण्यात येणार आहे. संमेलनाचा समारोप विज्ञाननिष्ठ लेखक आणि किल्यांचे अभ्यासक प्र.के. घाणेकर करणार आहे. त्याचप्रमाणे या संमेलनामध्ये पर्यावरण आणि निसर्ग साहित्याचा लोकजागरण, पर्यावरण चळवळ आणि शासनाच्या धोरणावर पडणारा प्रभाव या विषयावर परिसंवाद आयोजित केला आहे.
परिसंवादाचे आयोजन
या परिसंवादामध्ये डॉ. वरद गिरी (बंगलोर), संतोष गोंधळेकर (पुणे), डॉ. सुरेश चोपणे (पुणे), प्रा. विद्याधर वालावलकर (ठाणे) सहभागी होणार आहेत. ललित लेखन, स्तंभलेखन आणि वर्तमान पत्रातील लेखन, संशोधन आणि पेपर सादरीकरण, समाजमाध्यम (सोशलमिडीया) या चार गटात चर्चासत्र होणार आहे. या चर्चासत्रातून पर्यावरण आणि निसर्ग संवर्धन चळवळ कशी गतिमान होऊ शकेल, याविषयी विचार विनिमय केला जाणार आहे.
संयोजन समिती नियुक्त
साहित्य संमेलनाच्या प्रभावी आयोजनाच्या दृष्टीने करण्यात आलेल्या संयोजन समितीमध्ये राजेंद्र नन्नवरे, किरण सोहळे, अर्चना उजागरे, उमेश इंगळे, सुरेंद्र चौधरी, मिलिंद भारंबे यांच्यासह साहित्य क्षेत्रातील अशोक कोतवाल, अशोक कोळी, माया धुप्पड, चंद्रकांत भंडारी, मनोज गोविंदवार, प्रा.तुषार चांदवडकर, गिरीश कुलकर्णी यांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी किरण सोहळे, अर्चना उजागरे यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन संयोजक राजेंद्र नन्नवरे यांनी केले आहे.