भाजीपाल्याचे भाव भिडले पुन्हा गगनाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 10:58 AM2020-07-22T10:58:23+5:302020-07-22T11:00:19+5:30

आवकमध्ये निम्म्याने घट : बटाटे ४० तर टमाटे ८० रुपये किलोवर, मालवाहतूकदार येण्यास तयार नाही

Vegetable prices skyrocketed again | भाजीपाल्याचे भाव भिडले पुन्हा गगनाला

भाजीपाल्याचे भाव भिडले पुन्हा गगनाला

Next

जळगाव : कोरोनाच्या धास्तीने मालवाहतूकदार येण्यास तयार नसल्याने भाजीपाल्यांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे त्यांचे भाव चढेच असून आता तर बटाटे ४० रुपये प्रति किलोवर पोहचले आहे. अशाच प्रकारे दररोज वापरात असणारी हिरवी मिरचीदेखील ६० रुपये तर टमाटे ८० रुपये प्रति किलोने विक्री होत आहे.

आवक निम्म्यावर
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज दोन हजार क्विंटलच्या जवळपास भाजीपाल्याची आवक होते. यात जळगावात ७ ते १३ जुलै दरम्यान असलेल्या कडक लॉकडाऊनच्या काळात भाजीपाल्याची आवक २५ ते ३० टक्क्यांवर आली होती. त्यानंतर आता लॉकडाऊन संपून आठवडा होईल तरी आवक पूर्णपणे सुरू झालेली नसल्याचे चित्र आहे. लॉकडाऊनच्या काळातील तुलनेत हळूहळू आवक वाढत जाऊन ती आता ५० टक्क्यांपर्यंत पोहचली आहे. सध्या केवळ ९०० ते एक हजार क्विंटल भाजीपाल्याची आवक सुरू असून नेहमीच्या तुलनेत अद्यापही ती ५० टक्केच आहे. मालवाहतूकदारांच्या धोरणामुळे ही आवक कमीच राहण्याची शक्यता आहे.

कोथिंबीर पुन्हा महाग
शनिवारी कोथिंबीरची मोठी आवक वाढली व जागोजागी कोथिंबीर विक्री करणारे वाहने व दुकान लागल्या होत्या. १० रुपये जुडीप्रमाणे विक्री होत असलेला कोथिंबीर पुन्हा महागला व तो पुन्हा ६० ते ७० रुपये प्रति किलोने विक्री होत आहे.

या कारणामुळे
भाज्यांचे भाव वाढले
-सध्या पावसाळ््यामुळे भाजीपाल्याचे उत्पादन चांगले येत असले तरी व मालवाहतुकीस बंदी नसली तरी मालवाहतूकदार मालाची ने-आण करण्यास तयार होत नसल्याने आवकवर परिणाम होत आहे.
-जळगावात जिल्ह्यातील विविध भागांसह औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड, कन्नड या भागातून भाजीपाल्याची आवक होत असते. यात प्रामुख्याने हिरवी मिरची व टमाटे हे बाहेरील जिल्ह्यातून येतात.
-सध्या अनेक वाहतूकदार येण्यास तयार नसल्याने या वस्तूंचे भाव वाढण्यासह बटाटे, कोबी, मेथी, पालक यांचेही भाव वाढत आहे. इतकेच नव्हे श्रावण सोमवारी मागणी वाढणाऱ्या गंगाफळचे भावदेखील आतापासून ६० रुपये प्रति किलोवर पोहचले आहे.

वाढीव भावाने विक्री
बाजार समितीमध्ये केवळ घाऊक विक्रेत्यांनाच भाजीपाला खरेदीची परवानगी असल्याने इतर विक्रेत्यांना माल मिळत नसल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. घाऊक विक्रेते नंतर इतर विक्रेत्यांना जादा दराने भाजीपाला विक्री करतात.

Web Title: Vegetable prices skyrocketed again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.