किनगावजवळील अपघातातील वाहनाची योग्यता मुदत संपलेली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:21 AM2021-02-17T04:21:33+5:302021-02-17T04:21:33+5:30
जळगाव : उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र विधीग्राह्य करताना नियमांचे पालन होत नसल्याची तक्रार गेल्या अनेक दिवसांपासून ...
जळगाव : उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र विधीग्राह्य करताना नियमांचे पालन होत नसल्याची तक्रार गेल्या अनेक दिवसांपासून केली जात आहे. असे असले तरी योग्यता मुदत संपलेली वाहने अजूनही रस्त्यावर सुसाट असल्याचे चित्र आहे. अशाच प्रकारे किनगावजवळील अपघातातील वाहनाचीदेखील योग्यता मुदत ३ फेब्रुवारी २०२१ रोजीच संपली असल्याचे समोर आले आहे.
कोणतेही वाहन खरेदी व नोंदणी झाल्यानंतर त्याची योग्यता मुदत ठरविलेली असते. त्यानंतर त्याची पुन्हा तपासणी करून योग्यता प्रमाणपत्र विधीग्राह्य करावे लागते. यासाठी वेगवेगळ्या वाहनांची मुदत निश्चित केली जाते. ही मुदत संपल्यानंतर त्या-त्या वाहनांच्या प्रकारानुसार योग्यता प्रमाणपत्र विधीग्राह्य करण्यासाठी वेळही ठरविण्यात आला आहे. यात १० मिनिटांपासून ते २४ मिनिटांपर्यंत तपासणीची वेळ असते. तसे आदेशच २५ एप्रिल २०१६ रोजी तत्कालीन परिवहन आयुक्तांनी काढले आहेत. असे असतानाही याचे पालन जळगावातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात होत नसल्याची तक्रार जळगावातील गणेश कौतिकराव ढेंगे यांनी केली आहे.
वर्षभराच्या तक्रारीकडे दुर्लक्ष
जळगावातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नेमणुकीस असलेल्या मोटार वाहन निरीक्षकांकडून योग्यता प्रमाणपत्र विधीग्राह्य करताना नियमांचे पालन होत नसल्याची तक्रार गणेश ढेंगे यांनी १४ जानेवारी २०२० रोजी परिवहन आयुक्तांकडे केली होती. यात या प्रकाराविषयी सविस्तर माहिती देत ‘ब्रेक टेस्ट ट्रायल ट्रॅक’वर वाहन निरीक्षक नियमांचे पालन करीत नाही. तसेच वाहन निरीक्षकांच्या खासगी व्यक्तींकडून मनमानी करीत पैसे घेतात व वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र विधीग्राह्य करून दिली जात असल्याची तक्रार ढेंगे यांनी केली आहे. या प्रकाराला आळा बसण्यासाठी हालचाली होत नसल्याने ढेंगे यांनी पुन्हा १५ सप्टेंबर २०२० रोजी परिवहन आयुक्तांना निवेदन देऊन या विषयी तक्रार केली आहे.
दुर्लक्षामुळे अपघात
योग्यता प्रमाणपत्र विधीग्राह्य करताना नियमांचे पालन होत नसल्याने अनफिट वाहने रस्त्यावर फिरत असल्याची तक्रारदेखील ढेंगे यांनी केली असून यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. किनगावजवळ १५ जणांचा बळी गेलेल्या अपघातामुळे हा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. किनगावजवळ अपघात झालेल्या ट्रकची (एमएच १९, झेड ३६६८) योग्यता मुदतही संपलेली असल्याचे ढेंगे यांचे म्हणणे आहे. या वाहनाची १४ मार्च २०११ रोजी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे नोंद (रजिस्ट्रेशन) करण्यात आली होती व त्याची मुदत ३ फेब्रुवारी २०२१ संपली होती. मुदत संपलेली असतानाही हे वाहन रस्त्यावर कसे धावत होते व याकडे अधिकाऱ्यांचे लक्ष नाही, का असा सवाल उपस्थित केला जात आहे.