नाहाटा चौफुलीवर पुलाखालून वाहतूक खुली झाल्याने वाहनधारकांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:17 AM2020-12-06T04:17:42+5:302020-12-06T04:17:42+5:30

चिखली ते तरसोद महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून गेल्या अनेक महिन्यांपासून नाहाटा चौफुलीवर पुलाचे काम ...

Vehicle owners were relieved as traffic was opened under the bridge at Nahata Chowfuli | नाहाटा चौफुलीवर पुलाखालून वाहतूक खुली झाल्याने वाहनधारकांना दिलासा

नाहाटा चौफुलीवर पुलाखालून वाहतूक खुली झाल्याने वाहनधारकांना दिलासा

Next

चिखली ते तरसोद महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून गेल्या अनेक महिन्यांपासून नाहाटा चौफुलीवर पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे अत्यंत गजबजलेल्या या चौफुलीवर नेहमीच वाहतुकीची कोंडी होत होती. सुरू असलेल्या पुलाच्या कामामुळे वाहनांना फेरा मारून जावे लागत होते. तसेच कच्च्या रस्त्यामुळे उडणाऱ्या धूळ तसेच खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त झाले होते. सभोवतालच्या परिसरातील रहिवाशांचे आरोग्यही धोक्यात आले होते. शिवाय वाहतूक शाखेचे कर्मचारी यांनाही कर्तव्य बजावत असताना धुळीचा मोठा त्रास सहन करावा लागत होता.

मात्र पुलाखालील रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याने जामनेरकडे व शहरातील नाहाटा परिसर, विकास कॉलनी, साई मंदिराकडे जाणाऱ्या वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. याशिवाय महामार्गावर रेल्वे उड्डाणपुलाचे कामही गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. त्यामुळे जुन्या महामार्गावर वाहतुकीची कोंडी नित्याची बाब झालेली आहे, मात्र रेल्वे उड्डाणपुलाच्या पुढे शहराकडील दिशेने सिंधी कॉलनी व शहरातील अनेक भागांना जोडणारा सर्व्हिस रोड नाहाटा चौफुलीपर्यंत खुला करण्यात आल्याने शहरात येणाऱ्या दुचाकी, तीनचाकी जुन्या महामार्गावरून न जाता सर्व्हिस रोडचा वापर करत आहे, त्यामुळेही महामार्गावरील वाहतूक विभागली गेली आहे. याचा वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नवोदय विद्यालयासमोर उड्डाणपुलाच्या कामाची गती वाढवावी

महामार्ग चौपदरीकरणाअंतर्गत नवोदय विद्यालयासमोर उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाचे काम सुमारे दीड वर्षापासून सुरू आहे. जळगावकडून भुसावळ शहर, अकोला, नागपूरकडे जाणाऱ्या वाहनांना या ठिकाणाहून यावे लागते. पुलाचे काम संथ गतीने सुरू असल्यामुळे अनेकवेळा मलकापूर, अकोला, नागपूरकडे जाणारी अवजड वाहने रस्ता लक्षात न आल्यामुळे शहरातून जाणाऱ्या मार्गावरून बऱ्हाणपूरकडे जातात पुढे लांब फेरा मारून परत माघारी येऊन वळण घेऊन मलकापूरकडे जातात. यामुळे या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे तसेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. नवोदय विद्यालयासमोरील पूल लवकरात लवकर कार्यान्वित झाल्यास जड वाहनचालकांची दिशाभूल होणार नाही. यामुळे या पुलाच्या कामाला गती मिळावी, अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे

Web Title: Vehicle owners were relieved as traffic was opened under the bridge at Nahata Chowfuli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.