आरटीओतील वाहन चाचणी मोहाडी रोडला हलविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:16 AM2021-02-24T04:16:57+5:302021-02-24T04:16:57+5:30
जळगाव : कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता गर्दी टाळण्यासाठी आरटीओ कार्यालयात घेण्यात येणारी वाहनांची चाचणी आता मोहाडी रस्त्यावर अवजड ...
जळगाव : कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता गर्दी टाळण्यासाठी आरटीओ कार्यालयात घेण्यात येणारी वाहनांची चाचणी आता मोहाडी रस्त्यावर अवजड वाहनांच्या चाचणीच्या जागेवर घेतली जाणार आहे. सोमवारीच आरटीओ अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली. या निर्णयामुळे गैरसोयच होणार असून तेथेही गर्दीच होणार असल्याने या निर्णयास वाहनधारकांनी विरोध दर्शविला आहे.
मोहाडी रस्त्यावर आधीच वाहनांचे फिटनेस व अवजड वाहनांची चाचणी घेतली जाते, त्यानंतर आता दुचाकी, तीन चाकी, चारचाकी व इतर तत्सम वाहनांची चाचणीही मोहाडी रोडला होणार आहे. आरटीओ कार्यालयातील गर्दी कमी होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला असला तरी मोहाडी रोडलाही गर्दीच होणार आहे. त्याशिवाय येथील ट्रॅक व मोहाडी रोडचा ट्रॅक यात फरक आहे. दरम्यान, गर्दीचे विभाजन करण्यासाठी दुचाकींची नोंदणी व इतर कामकाज हे डीलरकडेच केले जाणार आहे.
रोज ८०वाहनांची चाचणी
आरटीओ कार्यालयात बीएस-४, सीआरटीएम व इतर कामे केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आरटीओ कार्यालयात रोज ८० ते ८५ जणांची वाहनांची चाचणी घेतली जाते, याआधी हा आकडा दोनशेच्या घरात होता. आता त्यात घट झालेली आहे. नवीन वाहन परवाना काढणे, ऑनलाईन नोंदणी करणे, वाहन परवान्यासाठी संगणकावर परीक्षा, त्याशिवाय आर्थिक व्यवहारासंबंधी कामे तीन वाजेपर्यंत चालतात, त्यामुळे या लोकांची गर्दी होतेच. मोहाडी रोडला चाचणीचा निर्णय घेण्याआधी वाहनधारकांना तशी पूर्व कल्पना देणे आवश्यक होते, अचानक घेतलेल्या निर्णयामुळे ऐनवेळी वाहन उपलब्ध करण्यापासून तर इतर अनेक अडचणी निर्माण होत असल्याचे वाहनधारकांचे म्हणणे आहे.
कोट..
कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने गर्दी टाळण्याठी काही निर्णय घेण्यात आले आहेत. दुचाकींची नोंदणी व इतर कामे आता डीलरकडेच केली जातील, तेथे वाहन निरीक्षकांची ड्युटी लावली जाईल. मोहाडी रोडला फक्त चाचणी घेण्यात येणार आहे. उर्वरित कामे कार्यालयातच होतील.
-महेश देशमुख, प्रभारी सहायक परिवहन अधिकारी