दहिवद फाट्यावर अडविले तहसीलदारांचे वाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 08:09 PM2019-08-29T20:09:34+5:302019-08-29T20:10:21+5:30

सरकारी कामात अडथळा : ५० ते ६० जणांवर गुन्हा

 Vehicles of Tahsildars stopped at Dahvid Ghat | दहिवद फाट्यावर अडविले तहसीलदारांचे वाहन

दहिवद फाट्यावर अडविले तहसीलदारांचे वाहन

Next


अमळनेर : रेशन दुकानाच्या तपासणीसाठी गेलेल्या तहसीलदारांची गाडी अडवून अडथळा निर्माण करून मुदार्बादच्या घोषणा देणा-या दहिवदच्या एका महिलेसह इतर ५० ते ६० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऐन पोळ्याच्या सणाच्या वेळी ग्रामस्थांना धान्य मिळत नसल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार तहसीलदार ज्योती देवरे, दहिवदचे तलाठी स्वप्नील कुलकर्णी, हेडावेचे तलाठी हर्षवर्धन मराठे, अमळनेरचे तलाठी पुरुषोत्तम पाटील, अमलगावचे तलाठी धीरज देशमुख, दोधवदचे तलाठी वाल्मिक पाटील, सुनील पंचभाई, कोतवाल प्रदीप देसले या कर्मचा-यांसह दुकान तपासण्यासाठी दहिवद येथे जाण्यासाठी निघाल्या. गावापासून ५ किमी अंतरावर धुळे-चोपडा रस्त्यावरील दहिवद फाट्याावर जयश्री साळुंखे (दाभाडे) व दीपक गिरीधर पाटील यांच्यासह ५० ते ६० लोकांनी रस्ता अडवून ठेवला होता. ‘तुम्ही रास्ता रोकोची परवानगी घेतलेली नाही, कायदेशीर कारवाई होईल’ अशा सूचना तहसीलदार देवरे यांनी स्पीकरवरून दिल्या. मात्र त्यांचे वाहन जाऊ दिले नाही. तहसीलदार देवरे खाली उतरून जात असताना त्यांना मज्जाव करण्यात आला आणि तहसीलदार मुदार्बाद , प्रशासन हमसे डरती है, पोलीस को आगे करती है अशा घोषणा देऊन शासकीय कामात अडथळा निर्माण केला. देवरे यांनी पोलीस निरीक्षकांना भ्रमणध्वनीद्वारे कळवुन २ पोलिसांना पाचारण केले. देवरे या दुकानांची तपासणी करत असताना पुन्हा जयश्री साळुंखे व दीपक पाटील यांनी येऊन जोरजोरात बोलून अडथळा निर्माण केला. याबाबत अमळनेर पोलीस स्टेशनला जयश्री साळुंखे (दाभाडे), दीपक पाटील यांच्यासह ५० ते ६० जणांवर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास राजेंद्र माळी करीत आहेत.

Web Title:  Vehicles of Tahsildars stopped at Dahvid Ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.