विना परवानगी प्रचार करणारे वाहने होणार जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 12:05 PM2019-04-10T12:05:04+5:302019-04-10T12:05:44+5:30

निवडणूकविषयक मार्गदर्शन बैठक

Vehicles without promotion will be seized | विना परवानगी प्रचार करणारे वाहने होणार जप्त

विना परवानगी प्रचार करणारे वाहने होणार जप्त

Next

जळगाव : लोकसभा निवडणुकीसाठी जळगाव व रावेर मतदार संघासाठी आता उमेदवार निश्चित झाले असून यापुढे दोन्ही लोकसभा मतदार संघात विना परवानगी ध्वज व बॅनर लावलेले वाहने प्रचार करत असतील अशा वाहन धारकांवर तातडीने गुन्हे दाखल करुन वाहने ताब्यात घ्यावे व निवडणूक होईपर्यत ती सोडू नयेत असे निर्देश जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी मंगळवारी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात मंगळवारी लोकसभा निवडणूक विषयी विविध मुद्यांवर मार्गदर्शन करण्यासाठी बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी ढाकणे यांच्यासह केंद्रीय निवडणूक निरीक्षक डॉ. अजयकुमार, छोटे लाल पासी, असिम विक्रांत मिंज, मधुकर आनंद, वेणूधर गोडेसी, अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन.पाटील, मनपा आयुक्त डॉ. उदय टेकाडे, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, उपजिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, अपर पोलीस अधिकारी रोहित मतीन आदी उपस्थित होते.
चेकपोस्टवर व सीमावर्ती भागात सी.सी.टी.व्ही.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक भयमुक्त व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी निवडणूक कालावधीत सर्व यंत्रणांनी समन्वयाने कामे करावे व आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, अशा सूचना या वेळी देण्यात आल्या. निवडणूक कालावधीत सर्व यंत्रणांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या नियमांचे पालन करुन काम करावे. निवडणुकीच्या कालावधीत सर्व चेकपोस्टवर व सीमावर्ती भागात सी.सी.टी.व्ही. बसविण्यात आले असून त्या ठिकाणी एस.एस.टी व एफ.एस.सी. पथकांनी व पोलीस यंत्रणांनी बारकाईने लक्ष ठेवावे व वाहनांची कडक तपासणी करावी. यासाठी सर्व यंत्रणांमध्ये समन्वय राहू ठेवा अशा सूचनाही डॉ. ढाकणे यांनी यावेळी केल्या. कम्युनिकेशन प्लॅन करताना त्यात सर्व बाबीचा उल्लेख केला पाहिजे असेही त्यांनी सांगितले. निवडणूक कालावधीत नियंत्रणासाठी एस.एस.टी व एफ.एस.सीच्या ३६ पथकांमध्ये २८८ अधिकारी व कर्मचारी कार्यरत असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

एकाच उमेदवाराला वारंवार मैदान देऊ नये
उमेदवाराने निवडणूक कालावधीत रोजचा खर्चाचा अहवाल दररोज सादर करावा. यासाठी सहाय्यक निवडणूक खर्च निरीक्षकांनी उमेदवारांच्या खर्चावर गांभीर्याने नजर ठेवावी असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. उमेदवाराने निवडणूक कालावधीत प्रचारासाठी मैदान आरक्षित केले असेल तर त्या वेळेत उपलब्ध करुन द्यावे, परंतु एकच उमेदवार वारंवार मैदान आरक्षित करत असेल तर त्यांना मैदान उपलब्ध करुन देवू नये, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
एकमेकांच्या संपर्कात रहा
यावेळी केंद्रीय निवडणूक निरीक्षक डॉ. अजयकुमार म्हणाले की, निवडणूक कालावधीत सर्व यंत्रणांनी गांभीर्याने कामे करावेत, यात प्रामुख्याने सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, कम्युनिकेशन प्लॅन, मतदान केंद्रे, नोडल अधिकारी, सुक्ष्म निरीक्षक, व्हिडिओ ग्राफर यांनी एकमेकांच्या संपर्कात राहून कामे करावेत असेही त्यांनी सांगितले.
गुन्हेगारांवर वचक ठेवा
निवडणूक कालावधीत पोलीस व उत्पादन शुल्क विभागाने नाका तपासणीवर मोठ्या प्रमाणात भर द्यावा व निवडणूक कालावधीत अवैध मद्य वाहतूक व मोठ्या रक्कमेची वाहतूक करणाऱ्या गुन्हेगारांवर वचक ठेवा असे केंद्रीय पोलीस निरीक्षक असिम मिंज यांनी सांगत जास्तीत जास्त गुन्हे कसे दाखल केले जातील याकडे लक्ष द्यावे, अशा सूचना दिल्या.
उमेदवारांच्या सभेचे सर्व रेकॉर्डिंग करा
सर्व उमेदवारांनी निवडणूक आयोगांच्या नियमांची पालन करुन दररोज निवडणूक खर्चाची माहिती द्यावी व सर्व उमेदवारांना समान न्याय देण्यासाठी यंत्रणांनी काम करावे, अशा सूचना निवडणूक खर्च निरीक्षक मधुकर आनंद व वेणूकर गोडेसी यांनी दिल्या. सोबतच उमेदवारांच्या सभेचे सर्व रेकॉर्डिंग, व्हिडिओग्राफरने करावे, यामुळे उमेदवारांनी सभेसाठी किती खर्च केला हे लक्षात येते असेही त्यांनी यावेळी स्स्पष्ट केले.
या बैठकीस जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघासाठी नियुक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, उप विभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, बीडीओ, नगर परिषदेचे मुख्य अधिकारी, पोलीस निरीक्षक, नोडल अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Vehicles without promotion will be seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव