अतिक्रमणाच्या धडक कारवाईने विक्रेत्यांची पळापळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:13 AM2021-01-09T04:13:04+5:302021-01-09T04:13:04+5:30
मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांनी अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन सकाळी ११पासून फुले मार्केटपासून कारवाईला सुरुवात केली. फुले मार्केटच्या ...
मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांनी अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन सकाळी ११पासून फुले मार्केटपासून कारवाईला सुरुवात केली. फुले मार्केटच्या आत व बाहेर अनेक नागरिक रस्त्यावरच कपडे विक्री करताना आढळून आले. रस्त्यावर व्यवसाय न करण्याबाबत यापूर्वीही अनेकवेळा समन्स दिला असताना, हे विक्रेते बिनधास्तपणे व्यवसाय करताना आढळून आले. कारवाईसाठी आलेल्या अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाहताच विक्रेत्यांची एकच धावपळ उडाली. यावेळी १० ते १५ विक्रेत्यांचा माल जप्त करण्यता आला. यावेळी बळीराम पेेठेतही काही विक्रेत्यांचा माल जप्त करण्यात आला.
यानंतर अतिक्रमण विभागाने आपलो मोर्चा नवीन बसस्थानकाकडे वळविला. बसस्थानकासमोरील व भजे गल्लीतील ८ ते १० विक्रेत्यांचे साहित्य जप्त करण्यात आले. यावेळी विक्रेत्यांनी प्रचंड विरोध केल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, दिवसभरात विविध ठिकाणी कारवाई सुरूच होती.
विक्रेत्यांनी घेतली आयुक्तांची भेट
मनपातर्फे शुक्रवारी दिवसभरात अतिक्रमण विरोधात धडक कारवाई केल्यानंतर, विक्रेत्यांचे चांगलेच धांबे दणदणाले होते. कारवाईनंतर अनेक विक्रेत्यांनी मनपात येऊन आयुक्त सतीश कुलकर्णी यांची भेट घेतली व जप्त केलेला माल परत देण्याची मागणी केली. तसेच यानंतर उपायुक्त संतोष वाहुळे यांचीदेखील भेट घेतली. जप्त केलेल्या माला संदर्भात प्रशासन नंतर निर्णय घेणार असल्याचे विक्रेत्यांना सांगण्यात आले.