विक्रेत्यांनी पोलिसांना न जुमानता केली झटापट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:19 AM2021-04-30T04:19:58+5:302021-04-30T04:19:58+5:30
बजरंग बोगद्याजवळ विक्रेते - मनपा कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार वाद : दगडफेकीचा प्रयत्न; तणावाची परिस्थिती निर्माण लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ...
बजरंग बोगद्याजवळ विक्रेते - मनपा कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार वाद : दगडफेकीचा प्रयत्न; तणावाची परिस्थिती निर्माण
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाला रोखण्यासाठी सकाळी ११ वाजेनंतर सर्वच अत्यावश्यक सेवा बंद करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. असे असतानादेखील नियोजित जागेवर न बसता रस्त्यावरच व्यवसाय करणाऱ्या भाजीपाला विक्रेत्यांचा मनपाच्या पथकासोबत बुधवारी सकाळी संघर्ष झाला. वाद विकोपाला जाऊन चक्क विक्रेत्यांनी दगडफेक करण्याचाही प्रयत्न केला. एवढेच नव्हे तर बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांनाही न जुमानता विक्रेत्यांनी झटापट केल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोनाचा कहर वाढल्यामुळे आता अत्यावश्यक सेवादेखील सकाळी ७ ते ११ या वेळेत असून, बजरंग बोगद्याजवळील विक्रेत्यांना मानराज पार्कजवळ जागा निश्चित केल्यानंतरही भाजीपाला विक्रेते नवीन जागेवर जाण्यास नकार देत आहेत. त्यातूनच बुधवारी सकाळी विक्रेते व प्रशासनात जोरदार वाद झाला.
आणि विक्रेते ट्रॅक्टरसमोर झाले आडवे
सकाळी ११ वाजेनंतरदेखील काही जणांकडून नियमांचे उल्लंघन केले जात आहे. असाच प्रकार बजरंग बोगदा ते पिंप्राळा उड्डाणपुलादरम्यान सुरू आहे. बुधवारी सकाळी ११ वाजेनंतरही भाजीपाला विक्रेते गल्लीबोळात दुकाने लावत असल्याने पथकाने हटकले. यावेळी काही मालदेखील जप्त करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे सर्व विक्रेत्यांनी सामूहिकरीत्या पथकाला विरोध करत घेरण्याचा प्रयत्न केला. यावेळी जोरदार वाद झाला. हा प्रकार एवढ्यावर थांबला नाही तर विक्रेत्या महिला व पुरुषांनी थेट पालिकेच्या ट्रॅक्टरसमोर आडवे येत हमरीतुमरी केली, तर काही वेळ ट्रॅक्टर रस्त्यावरच रोखून ठेवले होते.
हातात घेतले दगड
मनपाच्या पथकाकडून भाजीपाला जप्त करण्याची कारवाई सुरू असताना अचानक कोणीतरी पथकाच्या दिशेने दगड भिरकावले. यात एका कर्मचाऱ्याच्या हाताला दगडाचा मार लागला तर काही विक्रेत्यांनीदेखील हातात दगड घेतले होते, अशी माहिती मनपाकडून देण्यात आली. विक्रेते पथकाला जुमानत नसल्यामुळे उपायुक्त संतोष वाहुळेदेखील घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी एका विक्रेत्याने थेट मनपाच्या ट्रॅक्टरवर चढून कारवाईचा विरोध केला.
शाब्दिक वादनंतर पोलिसांशी केली झटापट
मनपा कर्मचाऱ्यांना विक्रेते जुमानत नसल्यामुळे अखेर जिल्हा पेठ पोलिसांचे पथक तेथे दाखल झाले होते. यावेळी गोंधळ घालणाऱ्या विक्रेत्या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी भाजीपाला विक्रेत्यांनी एकत्र येत पोलिसांनाही विरोध सुरू केला. यावेळी तीन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असता पोलीस कर्मचाऱ्यांसोबत शाब्दिक वाद झाल्यानंतर झटापट करण्यात आल्याचे मनपा उपायुक्त यांनी सांगितले.
गुन्हा दाखल
याप्रकरणी रात्री जिल्हापेठ पोलीस ठाण्यात श्याम आनंदचंद भोई (रा.खंडेराव नगर), आकाश शिवाजी गावंडे (रा. रामेश्वर कॉलनी), सागर शिवाजी गावंडे यांच्यासह १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे दंगलीचा गुन्हादेखील त्यांच्यावर दाखल करण्यात आला आहे तसेच या प्रकरणी तीन जणांना ताब्यात घेतले असल्याची माहिती जिल्हापेठ पोलिसांनी दिली.