व्हेंटिलेटर उपलब्ध असूनही उपयोगात नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 08:52 PM2020-09-27T20:52:13+5:302020-09-27T20:52:20+5:30
भुसावळ : माजी आमदार संतोष चौधरी यांनी मांडली आरोग्य मंत्री टोपे यांच्याकडे व्यथा
भुसावळ : साकेगाव जवळील ट्रामा सेंटर येथे कोरोना काळात व्हेंटीलेटर उपलब्ध असतांना सुद्धा गेल्या अनेक महिन्यापासून ते केवळ पडून आहेत. व्हेंटिलेटर अभावी अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांसाठी समस्या निर्माण होत असतान येथे व्हेंटीलेटर असूनही त्याचा उपयोग होत नसल्याची व्यथा वजा तक्रार माजी आमदार संतोष चौधरी यांनी मुंबई येथे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली.
कोरोना रुग्णांचा आलेख दिवसागणिक उंचावत असून व्हेंटिलेटर अभावी अनेक रुग्णांना खाजगी रुग्णालय तसेच इतर शासकीय रुग्णालयात हलवावे लागत आहे, ट्रामा सेंटर येथे गेल्या काही महिन्यापासून व्हेंटिलेटर उपलब्ध असून सुद्धा त्याचा उपयोग होत नाही. याबाबत शहरातील नागरिकांच्या तक्रारी भ्रमणध्वनीद्वारे माजी आमदार संतोष चौधरी यांच्याकडे आल्या होत्या.
उपलब्ध असलेले व्हेंटिलेटर वापराविना बंद खोलीत धूळखात पडलेले आहे, त्याचा उपयोग महामारीच्या काळात नाही तर कधी करणार? असा प्रश्नही नागरिकांसमोर आहे.
हा प्रकार माजी आमदार संतोष चौधरी यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या निदर्शनास आणून दिला आहे. तसेच उपलब्ध असलेले व्हेंटिलेटर तातडीने उपयोगात आणावेत यासाठी स्थानिक प्रशासनाला आदेशीत करावे अशी मागणीही चौधरी यांनी केली आहे.चौधरी यांच्या मागणीची दखल घेत आरोग्य मंत्री टोपे यांनी संबंधित विभागाला त्वरित कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. तसेच याबाबतची प्रत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , उपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना सुद्धा पाठवण्यात आल्या आहेत.
पालिका रुग्णालयात नाही
पीएमची व्यवस्था
नाशिक विभागात अ दर्जा प्राप्त असलेल्या येथील नगरपालिकेच्या रुग्णालयात मृत्यूदेहाचे विच्छेदन (पीएम) करण्याची व्यवस्था नाही. तसेच डॉ.आंबेडकर कोविड केअर सेंटर येथे रुग्णांसाठी अंघोळीला गरम पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे गेल्या तीन दिवसापासून रुग्णांनी आंघोळ केली नाही. ा अनेक भौतिक सुविधा नसल्याची बाब कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सचिन चौधरी यांनीही आरोग्य मंत्री टोपे यांच्या निदर्शनास आणून दिली.
व्हेंटिलेटर उपलब्ध झालेले आहेत, मात्र वीज पुरवठा खंडित झाला तर एक सेकंदही व्हेंटिलेटरचा उपयोग होत नाही. यासाठी वीज पुरवठा खंडित झाल्यास इन्वर्टर चालण्यासाठी बॅटरी इन्वर्टर असणे आवश्यक होते ते उपलब्ध झालेले नव्हते. येत्या आठवडाभरात व्हेंटिलेटरची सेवा रुग्णांसाठी उपलब्ध केली जाईल.
-डॉ.देवर्शी घोशल,
वैद्यकीय अधीक्षक ,भुसावळ.