अंदाज समितीचे अध्यक्ष कांबळे व आमदार पाटील यांच्यात शाब्दिक चकमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:21 AM2021-08-27T04:21:19+5:302021-08-27T04:21:19+5:30
मुक्ताईनगर, जि. जळगाव : बोदवड उपसा सिंचन योजनेच्या जॅकवेलच्या कामाच्या पाहणीप्रसंगी विधिमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष रणजित कांबळे व ...
मुक्ताईनगर, जि. जळगाव : बोदवड उपसा सिंचन योजनेच्या जॅकवेलच्या कामाच्या पाहणीप्रसंगी विधिमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष रणजित कांबळे व आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. दरम्यान, आमदार कांबळे यांनी विदर्भ व उत्तर महाराष्ट्र, असा उल्लेख केल्याने शिवसेना कार्यकर्त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा देत समितीच्या वाहनांचा ताफा अडवला. गुरुवारी सकाळी ११.३० वाजता हा प्रकार घडला.
राज्याची विधिमंडळ अंदाज समिती सध्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे.
समितीने गुरुवारी मुक्ताईनगर तालुक्याला भेट दिली. मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णा नदीच्या काठावर सुरू असलेल्या बोदवड उपसा सिंचन योजनेच्या कामाची पाहणी समितीच्या सदस्यांनी केली. त्याचवेळी आमदार चंद्रकांत पाटील हेही तिथे पोहोचले. यावेळी आमदार कांबळे यांनी विदर्भाच्या योजनेचा निधी या कामासाठी पळविला असल्याचा वारंवार उल्लेख केला. यावेळी आमदार चंद्रकांत पाटील यांनी विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र असे न म्हणता संपूर्ण महाराष्ट्र आहे, असा मुद्दा मांडला, तसेच या योजनेला कॅबिनेटची मंजुरी नसल्याचा आरोप आमदार कांबळे यांनी केला.
यावर आमदार पाटील यांनी कॅबिनेटच्या मंजुरीचे पत्रच त्यांना दाखवले. यावरून दोन्ही आमदारांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. यावेळी उपस्थित असलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा दिल्या. त्यामुळे वातावरण गंभीर बनले. पाहणी झाल्यानंतर समितीच्या वाहनांना ताफा शिवसेना कार्यकर्त्यांनी अडविला, यामुळे काही वेळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.
कोट
सिंचन योजनेची पाहणी करताना विदर्भ व उत्तर महाराष्ट्र, असा शाब्दिक गोंधळ उडाल्याने गैरसमज निर्माण झाला. त्यामुळे उपस्थित कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. आपण स्वतः कार्यकर्त्यांना शांत केले. या योजनेत मागील काळात काही गैरप्रकार व अनियमितता झाली असल्यास त्यावर कारवाई व्हावी, तसेच ही योजना लवकरात लवकर पूर्णत्वास नेणे अपेक्षित आहे.
-आमदार चंद्रकांत पाटील, मुक्ताईनगर