जळगावातील धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 12:24 PM2018-08-07T12:24:09+5:302018-08-07T12:26:38+5:30
यंदाही पावसाची सरासरी मागील वर्षी आजच्या तारखेइतकीच म्हणजे ३८.५ टक्के आहे. मात्र धरणांमध्ये पाणीसाठा गतवर्षीच्या तुलनेत कमी झाला आहे. हा पाणीसाठा वाढण्यासाठी आणखी जोरदार पावसाची गरज आहे.
जळगाव : यंदाही पावसाची सरासरी मागील वर्षी आजच्या तारखेइतकीच म्हणजे ३८.५ टक्के आहे. मात्र धरणांमध्ये पाणीसाठा गतवर्षीच्या तुलनेत कमी झाला आहे. हा पाणीसाठा वाढण्यासाठी आणखी जोरदार पावसाची गरज आहे.
यंदा जून महिन्याच्या सुरूवातीपासूनच पावसाने हजेरी लावली. त्यामुळे यंदा भरपूर पाऊस होईल अशी अपेक्षा होती. मात्र आजअखेर सरासरीच्या ३८.५ टक्के पाऊस जिल्ह्यात झाला आहे. मागील वर्षी आजच्या तारखेला ३८.३ टक्के पाऊस झाला होता.
धरणातील साठा चिंताजनक
मागील वर्षी आजच्या तारखेला झाला होता, तेवढाच पाऊस जिल्ह्यात यंदाही झालेला असला तरीही धरणांमधील पाणीसाठ्याची स्थिती मात्र चिंताजनक आहे. कारण मागील वर्षी आजच्या तारखेला जिल्ह्यातील धरणांमध्ये एकूण ३५.६५ टक्के पाणीसाठा होता. मात्र यंदा केवळ २२.८१ टक्के पाणीसाठा धरणांमध्ये आहे.
वाघूर, गिरणकची स्थिती चिंताजनक
जिल्ह्यातील तीन मोठ्या धरणांमध्ये मागील वर्षी आजच्या तारखेला ४३.८४ टक्के पाणीसाठा होता. आजच्या स्थितीला २७.७४ टक्के पाणीसाठा आहे. हतनूरमध्ये मागील वर्षी आजच्या तारखेला ७.५३ उपयुक्त जलसाठा होता. त्या तुलनेत यंदा चांगली स्थिती असून २१.०२ टक्के पाणीसाठा आहे. वाघूर व गिरणा धरणातील पाणीसाठ्याची स्थिती मात्र चिंताजनक आहे. गिरणा धरणात मागील वर्षी ५२.३१ टक्के पाणीसाठा होता. त्या तुलनेत यंदा केवळ २७.८१ टक्के पाणीसाठा झाला आहे. तर वाघूर धरणात ६३.३६ टक्के पाणीसाठा होता. त्या तुलनेत यंदा केवळ ३४.४९ टक्के पाणीसाठा झाला आहे. वाघूर धरणावर जळगाव शहरासह पाच पाणी योजना अवलंबून आहेत. तर गिरणा धरणावर जिल्ह्यातील चाळीसगावसह अनेक गावांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. तसेच शेतीही अवलंबून आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात वाढ होण्यासाठी जोरदार पावसाची गरज आहे.