कविवर्य ना. धों. महानोर यांना आचार्य अत्रे मानचिन्ह पुरस्कार
By विलास.बारी | Published: August 4, 2022 11:05 PM2022-08-04T23:05:01+5:302022-08-04T23:06:36+5:30
जळगावातील गांधी तीर्थ येथे १३ ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा
विलास बारी, जळगाव | लोकमत न्यूज नेटवर्क: आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या १२४ व्या जयंतीदिनी आचार्य अत्रे मानचिन्हाचा पुरस्कार या वर्षी कवी ना. धों. महानोर यांना प्रदान केला जाणार आहे. विशेष म्हणजे, हा समारंभ १३ ऑगस्ट रोजी कस्तुरबा सभागृह, गांधी तीर्थ येथे सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे.
आचार्य अत्रे यांचे निधन १३ जून १९६९ रोजी झाले. त्यानंतर १९७१ पासून २०२१ पर्यंत 'साहित्यसम्राट आचार्य अत्रे मानचिन्ह पुरस्कार' प्रदान करण्याचे कार्यक्रम मुंबईत आणि पुण्यात झाले. पहिल्यांदा हा कार्यक्रम जळगावात होत आहे. या वर्षीचा पुरस्कार कविवर्य ना. धों. महानोर यांना 'आत्रेय'तर्फे ॲड. राजेंद्र पै यांनी जाहीर केला. ते आचार्य अत्रे यांचे नातू आहेत. हा कार्यक्रम मुंबईत न करता जळगाव येथेच करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येईल. आमदार शिरीष मधुकरराव चौधरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. खान्देशमध्ये होणाऱ्या आचार्य अत्रे जयंती समारंभाला उपस्थित राहावे, असे आवाहन ॲड. राजेंद्र पै यांनी केले आहे. या समारंभाला ॲड. हर्षवर्धन देशपांडे हेसुद्धा उपस्थित राहणार आहेत.