राज्य शासनाच्या हस्तक्षेपाला कंटाळून कुलगुरूंचा राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 09:05 PM2021-03-01T21:05:48+5:302021-03-01T21:06:13+5:30
पत्रपरिषद : विद्यापीठ विकास मंचतर्फे शासनाचा निषेध
जळगाव : महाविकास आघाडी सरकार व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांच्या राजकीय हस्तक्षेपाला कंटाळून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठातील कुलगुरूंनी तडकाफडकी राजीनामा दिला असल्याचा आरोप करून विद्यापीठ विकास मंचचे विभाग प्रमुख तथा सिनेट सदस्य नितीन ठाकूर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. यावेळी अभाविप प्रदेशमंत्री सिद्धेश्वर लटपटे, सिनेट सदस्य राजेंद्र नन्नवरे, मनीषा खडके, दिनेश नाईक, अमोल मराठे आदी उपस्थित होते.
गेल्या अनेक दिवसांपासून राज्य शासन विद्यापीठाच्या कामकाजात हस्तक्षेप करीत आहे. विद्यापीठाकडील शिल्लक निधी शासनाकडे वर्ग करण्याचा आग्रह, परीक्षा घ्याव्यात की नाही, विद्यापीठाच्या खर्चातून जनता दरबार भरविणे, कुलसचिव नियुक्ती संदर्भात केलेला आक्षेप व त्यानंतर न्यायालयाने राज्य शासनाला दिलेली चपराक हे ताजे असतानाच राज्यातील दोन विद्यापीठांच्या कुलगुरूंनी राजकीय हस्तक्षेपाला कंटाळून राजीनामा देणे हे शिक्षण क्षेत्रातील दुर्दैवी बाब असल्याचेही नितीन ठाकूर म्हणाले.
प्रसिध्दीसाठी बिनबुडाचे आरोप
मागील चार वर्षांपासून कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील यांच्या कार्यकाळात विद्यापीठाचा कारभार सुरळीतपणे सुरू होता. राज्यात आघाडी सरकार अस्तित्वात आल्यापासून काही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वैयक्तिक प्रसिध्दीसाठी कुलगुरू व विद्यापीठ प्रशासनावर केलेल्या चुकीच्या व बिनबुडाच्या आरोपांमुळे व्यथित होऊन एका वैज्ञानिक, संवेदनशील असलेले प्रा.पी.पी.पाटील यांनी राजीनामा दिला असावा, असे स्पष्ट मत असल्याचे ठाकूर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
शिक्षण क्षेत्रातील वाढता हस्तक्षेप थांबवा
आता विद्यापीठात गोंधळ घालणाऱ्यांना अटकाव करण्यासाठी विद्यापीठ विकास मंच कटिबध्द राहणार आहे. त्यामुळे राज्य शासनाने शिक्षण क्षेत्रातील वाढता हस्तक्षेप थांबवावा, अशी मागणी विद्यापीठ विकास मंचतर्फे करण्यात आली.