शासनाच्या नव्हे तर दिलीप पाटलांच्या त्रासाला कंटाळून कुलगुरूंचा राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2021 09:13 PM2021-03-02T21:13:18+5:302021-03-02T21:13:26+5:30
देवेंद्र मराठेंचा आरोप : विविध संघटनांची आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरूच
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील यांनी राज्य शासन व विद्यार्थी संघटनांच्या त्रासाला नव्हे तर केवळ आणि केवळ सिनेट सदस्य दिलीप रामू पाटील यांच्या त्रासाला कंटाळून राजीनामा दिला असल्याचा खळबळजनक आरोप जिल्हा एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी केला आहे.
प्रा. पी.पी.पाटील यांनी कार्यकाळ पूर्ण होण्याआधी कुलगुरू पदाचा राजीनामा दिला. ही विद्यापीठ इतिहासातील दुर्देवी घटना आहे. त्यांच्यावर पहिल्या दिवसापासून दबाव होता़ परिणामी, त्यांना कधीही खुलेआम निर्णय घेता येत नव्हता. दिलीप पाटीले हे राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य झाल्यानंतर त्यांनी पहिल्या दिवसापासून कुलगुरूंच्या दालनात बसणे सुरू केले होते, असाही आरोप मराठे यांनी केला आहे. कुलगुरूंना प्रत्येक निर्णयाआधी दिलीप पाटील यांचा सल्ला घ्यावा लागत होते. त्यामुळे कुलगुरू यांच्यावर त्यांचा दबाव होता. याच त्रासाला कंटाळून कुलगुरूंनी राजीनामा दिला असल्याचा आरोप मराठे यांनी सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या व्हीडिओतून केला आहे. दरम्यान, कुलगुरूंनी आधीच त्यांच्या दालनात झालेले अतिक्रमण काढले असते, तर राजीनामा देण्याची वेळ आली नसती, असेही मराठे त्या व्हीडिओतून बोलत होते.