प्राचार्यांच्या भ्रष्टाचार प्रकरणावर कुलगुरु म्हणतात... तडजोड करुन प्रकरण मिटवून टाका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 12:08 PM2020-02-14T12:08:14+5:302020-02-14T12:10:00+5:30
सल्ला देणे दुर्देबी बाब- पियुष पाटील यांचा आरोप
जळगाव : नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ़ एल़पी़देशमुख यांनी केलेल्या भष्ट्राचाराबाबत पाच महिन्यात २८ वेळा तक्रारी केल्या़़, ३ वेळा स्मरणपत्रे दिले़़़, २ वेळा आंदोलनाचा इशारा दिला़़़पण या तक्रारींची साधी दखल विद्यापीठ प्रशासनाकडून घेण्यात आली नाही़़ या प्रकरणावर कुलगुरूंची भेट घेतली़ त्यावेळी त्यांनी तडजोड करून प्रकरण मिटविण्याचा अजब सल्ला आम्हाला दिला, असा आरोप तक्रारदार पियुष नरेंद्र पाटील यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत केला.
दरम्यान, डॉ़ एल़पी़ देशमुख यांनी माझ्याविरूध्द जाहीर पत्रकार परिषद घेऊन बदनामीचा कट रचला़ माझ्यावर बेछूट आरोपही केले, असे करून त्यांनी विद्यापीठ कायद्याची पायमल्ली केली असल्याचेही त्यांनी सांगितले़
पाच महिन्यात २८ तक्रारी
डॉ़ देशमुख यांनी टी़सी़ प्रकरणात केलेल्या भ्रष्ट्रचाराची चौकशी होवून आॅडीट व्हावे व त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीबाबत २८ तक्रारी विद्यापीठात केल्या आहेत़ ३ स्मरणपत्रे देण्यात आली आहेत़ दहा ते पंधरावेळ कुलगुरूंची भेट घेण्यात आली आहे़ परंतु, तक्रारींची कुठलीही दखल घेण्यात आलेली नाही, असे पियुष पाटील म्हणाले़
पाच दिवसात हकालपट्टी न केल्यास आंदोलन
प्राचार्य पद तसेच एम़सी़मेंबर पदावरून डॉ. देशमुख यांची हकालपट्टी न केल्यास विद्यापीठासमोर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
भेटण्यासाठी गेल्यावर कुलगुरुंनी काय सांगितले....
तुझी नेमकी प्राचार्य देशमुख यांच्याबद्दल वैयक्तिक काय नाराजी आहे़ त्यांना आणि मला तुझ्या सहकार्याची अपेक्षा आहे़ प्राचार्यांनी हा निरोप माझ्याजवळ दिला आहे़ तु तयार असशील तर आपण मिटींग लावू व तू केलेल्या आरोपांबाबत सांगतीश तशी तडजोड मी स्वत: मध्यस्थी राहून करून देईल़ तसेच तू राबवित असलेले रक्तदानाच्या उपक्रमाबाबत प्राचार्य कौतुक करतात, असेही त्यांनी सांगितले़
पण ते खुलासा देईना !
अनधिकृतपणे महाविद्यालय बंद केल्याप्रकरणी व जमावबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी सहसंचालक कार्यालयाकडे तक्रार केली होती़ तक्रारीची दखल घेवून सहसंचालक कार्यालयाकडून खुलासा सादर करण्याबाबत डॉ़देशमुख यांना दोन वेळेस नोटीस बजावण्यात आल्या़ मात्र, अजूनही त्यांनी खुलासा सादर केलेला नाही. सहसंचालक कार्यालयातील राम राठोड हे स्वत: आता जबाब नोंदविण्यासाठी जाणार असल्याचे त्यांनी सांगितले़
या प्रकरणाबाबत डॉ़ एल़पी़देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या आरोपांबाबत बोलण्यास असमर्थता दर्शविली़