शेजारच्यांशी झालेल्या भांडणात परीट संघटनेच्या उपाध्यक्षाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:15 AM2021-02-14T04:15:28+5:302021-02-14T04:15:28+5:30
जळगाव : शेजारच्यांशी झालेल्या भांडणात धक्काबुक्की होऊन त्यात परीट धोबी समाज संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल दौलत सोनवणे (५५) यांचा ...
जळगाव : शेजारच्यांशी झालेल्या भांडणात धक्काबुक्की होऊन त्यात परीट धोबी समाज संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल दौलत सोनवणे (५५) यांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी पाच वाजता मेहरुणमधील दत्त नगरात घडली. दरम्यान, या घटनेमुळे दोन गटात तणाव निर्माण झाला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी या भागात बंदोबस्त तैनात केला आहे.
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठल सोनवणे यांच्या शेजारी राहणारे अल्ताफ सैय्यद व डॉ.पिरजादे यांच्यात शनिवारी सायंकाळी पाच वाजता वाद झाला. तुम्ही बाहेर का बसता असे सोनवणे यांना विचारण्यात आले, त्यावरुन दोघं कुटुंबात वाद होऊन धक्काबुक्कीची घटना घडली होती. याच वेळी सोनवणे जमिनीवर कोसळले, त्यावेळी त्यांना घरी नेण्यात आले. त्यानंतर पुन्हा वाद झाला. त्यात ते पुन्हा जमिनीवर कोसळले. हा प्रकार समजल्यानंतर नगरसेवक गणेश सोनवणे व इतरांनी त्यांना मेहरुणमधील खासगी दवाखान्यात नेले, तेथून डॉक्टरांनी तपासणीअंती जिल्हा रुग्णालयात नेण्याचा सल्ला देण्यात आला. तेथे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी सोनवणे यांना मृत घोषीत केले. दरम्यान, या वादाचा त्यांना मानसिक धक्का बसला व त्यातच त्यांचा मृत्यू झाला असावा असा संशय आहे.
मृतदेहाच्या चेहऱ्यावर जखमा
सोनवणे यांच्या चेहऱ्यावर डोळ्यावर तसेच गालावर जखमा होत्या. पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी शवविच्छेदनगृहात जावून मृतदेहाची पाहणी केली. नातेवाईकांनी या घटनेला जबाबदार असलेल्या लोकांवर कारवाईची मागणी केली. शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, त्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल असे स्पष्ट करुन घटनास्थळावर खबरदारी म्हणून बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. सोनवणे हे मेहरुण विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमनही होते. रविवारी सकाळी शवविच्छेदन होऊन ११ वाजता अंत्यसंस्कार होणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी मंदा, मुलगा रितेश, गणेश व मुलगी जयश्री असा परिवार आहे.