संशयाच्या भुताने घेतला जामनेर येथील नर्सचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 11:17 AM2019-02-06T11:17:28+5:302019-02-06T11:20:31+5:30

फरार असलेल्या पतीच्या मुसक्या आवळल्या

The victim of a suspect was the victim of a nursery in Jamner | संशयाच्या भुताने घेतला जामनेर येथील नर्सचा बळी

संशयाच्या भुताने घेतला जामनेर येथील नर्सचा बळी

Next
ठळक मुद्देओळखू येऊ नये म्हणून केले संशयिताने केले टक्कल; लग्नाची आॅर्डर देण्याच्या बहाण्याने केली अटक


सुनील पाटील
जळगाव : जामनेर येथील खासगी दवाखान्यातील नर्स मनीषा अनिल सपकाळे (वय २५) यांचा बळी हा पैशासाठी नाही तर संशयाच्या भूताने घेतल्याचे उघड झाले आहे. सतत मोबाईलवर बोलणे व परिक्षेचे नाव सांगून गायब झाल्याने तिच्या चारित्र्यावर संशय होता म्हणूनच संतापात पत्नीचा खून केल्याची कबुली पती अनिल चावदस सपकाळे (वय ३०) याने पोलिसांकडे दिली आहे. जामनेर पोलिसांच्या पथकाने धानोरा, ता.चोपडा येथून मंगळवारी सकाळी त्याला ताब्यात घेतले.
जामनेर येथील शिक्षक कॉलनीत ३ रोजी दुपारी दीड वाजता अनिल सपकाळे याने पत्नी मनिषा हिच्या डोक्यात काही तरी हत्यार टाकून गंभीर जखमी केले होते. प्रकृती चिंताजनक असल्याने मनीषाला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते.त्यानंतर त्याच दिवशी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. सोमवारी सायंकाळी मनिषाचा मृत्यू झाला. दरम्यान, याप्रकरणी प्रारंभी मनिषाची आई प्रभाबाई निना कोळी (रा.जामनेर) यांच्या फिर्यादीवरुन अनिल कोळीविरुध्द जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. घटनेनंतर अनिल हा फरार झाला होता. यात खुनाचे वाढीव कलम लागले आहे.
ओळख पटू नये म्हणून डोक्याचे केस काढले
घटनेच्याच दिवशी अनिल हा जामनेर येथून फरार झाला. आपल्याला कोणी ओळखू नये म्हणून त्याने डोक्याचे केस काढले आहेत. जळगाव येथून रेल्वेने तो सुरत येथे गेला. त्यानंतर दुसऱ्यादिवशी तो मुंबईत गेला. मिरारोड येथे ओळखीच्या लोकांचा त्याने आश्रय घेतला. दुसरीकडे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी त्याला पकडण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कामाला लावली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बी.जी.रोहोम, हे.कॉ. विजय पाटील व नरेंद्र वारुळे यांनी तांत्रिक माहितीचा आधार घेऊन तपासासाठी नेमलेल्या पथकाला त्याची माहिती दिली.
चायनीजची आॅर्डर द्यायची सांगून बोलावले
अनिल सपकाळे हा धानोरा येथे भागीदारीत चायनीजचे काम करीत होता. त्यामुळे तो तेथील लोकांच्या संपर्कात होता. जामनेरचे निरीक्षक प्रताप इंगळे यांनी सहायक निरीक्षक राजेश काळे, हे.कॉ.रमेश कुमावत, रामदास कुंभार व इस्माईल शेख यांचे पथक अनिलच्या मागावर सोडले होते. या पथकाने धानोरा येथील पोलीस पाटील दिनेश पाटील यांच्या माध्यमातून अनिल याच्याशी संपर्क साधला. मुलीच्या लग्नात चायनीजची आॅर्डर द्यायची आहे, असे सांगून त्याला मंगळवारी धानोरा येथे बालाविले. गावात येताच पोलीस पाटील यांनी त्याला अडावद पोलिसांच्या ताब्यात दिले. तेथून जामनेरच्या पथकाने अनिलला ताब्यात घेवून जळगाव येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणले.
महिनाभरात चारित्र्याच्या संशयावरुन दुसरा खून
जामनेर येथे चारित्र्याच्या संशयावरुन महिनाभरात दोन खून झाले. सरकारी वकील विद्या राजपूत उर्फ राखी पाटील यांचाही खून चारित्र्याच्या संशयावरुन झाला होता. तो खूनही पतीनेच केला होता तर नर्स असलेल्या मनिषाचाही खून पतीनेच व तोही चारित्र्याच्या संशयावरुनच झाला. दोन्ही घटनांमध्ये आरोपींना अटक झालेली आहे. दोन्ही घटनांमधील आरोपींच्या जबाबात साम्य आहे. चारित्र्यावर संशय असला तरी खून करण्याचा हेतू नव्हता...असे दोघांनी म्हटले आहे.
पंधरा दिवसापूर्वी चाकू खुपसण्याची धमकी... मनिषाची आई प्रभाबाई कोळी यांच्या म्हणण्यानुसार पती अनिल हा सतत चारित्र्यावर संशय घेऊन मनिषाला मारहाण करीत होता. पंधरा दिवसापूर्वी त्याने ‘चाकू खुपसून टाकीन’ अशी धमकी दिली होती. त्यामुळे मनिषा कमालीची घाबरली होती. या भीतीपोटी तिने आईला स्वत:जवळ बोलावून घेतले होते. ३ जानेवारी रोजी ती दवाखान्यात ड्युटीला गेली होती व दुपारी दीड वाजता घरी आली असता तिच्यावर पतीने हल्ला केला होता. त्यानंतर तो फरार झाला होता.

Web Title: The victim of a suspect was the victim of a nursery in Jamner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.