महामार्गाने घेतला भावी डॉक्टरचा बळी

By admin | Published: January 17, 2017 12:27 AM2017-01-17T00:27:21+5:302017-01-17T00:27:21+5:30

शिव कॉलनी थांब्यावर बुलेटला कंटनेरची धडक एकुलता मुलगा गेल्याने नातेवाईकांचा प्रचंड आक्रोश नायगावच्या पाटील कुटुंबावर कोसळले आभाळ मकर संक्रांतीला घरी आला असताना झाला अपघात

The victim is the victim of a future doctor | महामार्गाने घेतला भावी डॉक्टरचा बळी

महामार्गाने घेतला भावी डॉक्टरचा बळी

Next

जळगाव : राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा एकदा अपघात झाला असून मित्राला संभाजी नगरात सोडून द्रौपदीनगरातील आपल्या घरी जात असताना बुलेटला कंटेनरची धडक लागून कुंदन प्रतापराव पाटील (वय 19, रा.कृष्णा टॉवर, द्रौपदीनगर) हा एमबीबीएसचा विद्यार्थी जागीच ठार झाला. ही हृदयद्रावक घटना सोमवारी दुपारी एक वाजता राष्ट्रीय महामार्गावर शिव कॉलनी थांब्याजवळ स्टेट बँकेच्या शाखेसमोर घडली. कुंदन हा डॉ.पी.के.पाटील (मूळ रा.नायगाव ता.यावल) यांचा एकुलता मुलगा होता. कुंदनचा मृतदेह पाहून                         डॉ.पाटील व कुटुंबीयांनी जिल्हा               सामान्य रुग्णालयात प्रचंड आक्रोश केला. त्यांचे द्रौपदीनगगारीत आई  हे निवासस्थान सुन्न झाले. रात्री आठ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
उपअधीक्षकांनी अडविला कंटेनर
अपघात झाला त्याच वेळी पोलीस उपअधीक्षक महारु पाटील हे तालुका पोलीस स्टेशनला भेट देवून मुख्यालयात येत होते. त्यांच्यासमोरच हा अपघात झाला. पळून जाण्याच्या तयारीत असताना पाटील यांनी कंटेनर अडविला. तर त्यांचा आरटीपीसी विजय काळे यांनी कुंदनला रिक्षातून दवाखान्यात रवाना केले तर चालक जितेंद्र सोनार यांनी कंटेनर चालकाला जिल्हा पेठ पोलिसांच्या ताब्यात दिले.
रिक्षा चालकांना विनवण्या
जखमी अवस्थेत कुंदनला दवाखान्यात दाखल करण्यासाठी पोलीस विजय काळे यांनी रिक्षा थांबविल्या,मात्र चालकांनी माणुसकी न दाखविता तेथून पळ काढला. शेवटी विनवणी केल्यानंतर एक रिक्षा चालक तयार झाला व कुंदनला सिव्हीलमध्ये हलविले.
महामार्गावर वाहतुकीचा कोंडी
या अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावर दोन्ही बाजुंनी वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. रामानंद नगरचे पोलीस निरीक्षक प्रवीण वाडिले, निर्भया पथकाच्या सहायक निरीक्षक सारिका कोडापे, जिल्हा पेठचे उपनिरीक्षक गजानन राठोड या अधिका:यांसह कर्मचा:यांनी घटनास्थळी धाव घेवून वाहतूक नियंत्रणात आणली.
दोन्ही आमदारांकडून सांत्वन
अपघाताचे वृत्त समजताच कुंदन तसेच त्याच्या वडीलांच्या मित्र व नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. तरुण मुलगा अपघातात ठार झाल्याने त्याच्या आई, वडीलांचा आक्रोश पाहून उपस्थितांनाही अश्रू आवरणे कठीण झाले होते. यावेळी प्रचंड गर्दी झाली होती. आमदार चंदूलाल पटेल व आमदार सुरेश भोळे यांनी रुग्णालयात भेट देवून डॉक्टरांचे सांत्वन केले.
आई बंगल्यावर शोककळा
डॉ.पी.के. पाटील व त्यांची पत्नी गायत्री पाटील हे द्रौपदीनगर (बेंडाळे स्टॉपनजीक) येथे आई या बंगल्यात राहतात. गायत्री पाटील या गृहीणी आहे. अपघाताचे वृत्त धडकताच आई बंगल्यावर शोककळा पसरली. नातेवाईक व द्रौपदीनगरवासीयांनी धाव घेतली व कुटुंबीयांना धीर दिला.
दहावीला गुणवत्ता यादीत
डॉ.पी.के.पाटील यांचे जलाराम नगरात ज्योत्स्नाई हेल्थ केअर सेंटर  आहे. गेल्या अनेक वर्षापासून ते जळगावातच स्थायिक आहेत. कुंदन हा धुळे येथे जवाहर वैद्यकिय महाविद्यालयात एबीबीएसचे शिक्षण घेत होता तर मुलगी गितीका ही मू.जे.                 महाविद्यालयात बारावीला शिक्षण घेत आहे. आई गायत्री गृहीणी आहे. कुंदन याचे दहावीर्पयत शिक्षण जळगावात झाले आहे. आर.आर.शाळेचा तो विद्यार्थी होता. दहावीत 94 टक्के मिळवित तो गुणवत्ता यादीत आला होता. त्यानंतर पुढील शिक्षण नाशिक येथे झाले.
मूळचे नायगावचे
डॉ.प्रताप पाटील हे मूळचे नायगाव ता.यावल येथील आहे. डॉ.पाटील यांना जितेंद्र नामक सावत्र बंधू असून, जितेंद्र हे एका खाजगी कंपनीत कार्यरत आहे. नायगाव येथे त्यांची शेतीही आहे. या घटनेची माहिती मिळताच कुंदनचे मित्र, नातेवाईक यांची मोठी गर्दी द्रौपदीनगरात झाली. परिसरातील नगरसेवक, विविध पक्षाचे कार्यकर्तेही त्यांच्या निवासस्थानी आले. हा परिसर सुन्न झाला. नायगाव येथील नातेवाइकही दुपारी 3 वाजेर्पयत दाखल झाले. रात्री आठ वाजता अत्यंत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
2 1 कुंदनला मोठा डॉक्टर बनविण्याचे होते वडिलांचे स्वप्न
कुंदन हा आपल्यापेक्षाही मोठा डॉक्टर व्हायला हवा, असे स्वप्न वडील डॉ.पी.के.पाटील यांनी उराशी बाळगले होते. 11 वी 12 वी विज्ञान शाखेचे शिक्षण नाशिक येथे झाले. त्याला चांगले यश मिळाले. त्यानंतर  एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी धुळे येथील जवाहर महाविद्यालयात पहिल्या वर्षात कुंदनने प्रवेश घेतला. तो मोठा डॉक्टर होण्याचे स्वप्न साकारत असतानाच क्रूर काळाने  झडप घातली.
सिनेमा पाहण्याचे केले होते नियोजन
वृषभ रोहीदास पाटील व कल्पेश अशोक कुदळ हे कल्पेशचे अगदी जिवलग मित्र. दोन दिवसापासून तिघंही सोबतच होते. रविवारी दुपारी तिघांनी वृषभच्या घरी जेवण केले तर रात्री बाहेर जेवण केले होते. कल्पेश व वृषभ हे दोघं पुणे येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहेत. सोमवारी रात्री ते पुणे येथे जाणार होते. त्यासाठी तिघं एकत्र ट्रॅव्हल्सच्या कार्यालयात गेले. तेथेच त्यांनी दुपारी सिनेमा पाहण्याचे नियोजन केले होते. तिकीट आरक्षण केल्यानंतर कल्पेश घरी गेला तर वृषभ व कुंदन हे सोबत आले. वृषभला त्याच्या घरी सोडल्यानंतर घरी जात असताना कुंदनवर काळाने झडप घातली.
काही दिवसापूर्वीच घेतली बुलेट़़़ कुंदन याला बुलेटची हौस होती, त्यामुळे डॉ.पाटील यांनी त्याला काही दिवसापूर्वीच बुलेट घेवून दिली होती. कुंदन हा प्रचंड हुशार होता. त्यामुळे वडीलांनी त्याची इच्छा पूर्ण केली होती. कुंदनजवळ हेल्मेट नव्हते.त्याने हेल्मेटचा वापर केला असता तर कदाचित त्याचा जीव वाचला असता. कुंदन हा बुलेटने धुळे र्पयत प्रवास करायचा. याच बुलेटवरून तो सोमवारी आपल्या मित्रांना भेटायला गेला होता.
कुंदन हा वडीलांप्रमाणेच मनमिळावू़़़ कुंदन हा अतिशय मनमिळावू, मेहनती होता. तो आपल्या कुटुंबाचा लाडका होताच. अभ्यासामध्ये तो कधी मागे पडला नाही. आपल्या मित्रांना तो कधीही दुखावत नव्हता. डॉ.पाटील हे देखील मिळेल त्या शुल्कात वैद्यकीय सेवा करतात. उपचाराविना कुणी त्यांच्याकडून परत गेले नसल्याचे त्यांच्या नातेवाइकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
कुंदन हा धुळे येथे जवाहर वैद्यकिय महाविद्यालयात एबीबीएसचे शिक्षण घेत होता.मकर संक्रातीसाठी गेल्या आठवडय़ातच तो घरी आला होता. वडिलांचा दवाखान्यात जेवणाचा डबा द्यायला जायचे असल्याने मित्र वृषभ रोहीदास पाटील याला संभाजी नगरात घरी सोडून तो बुलेटने (क्र.एम.एच.19 सी.सी.9799) महामार्गालगत असलेल्या द्रौपदीनगरात जायला निघाला.
शिव कॉलनी स्टॉपजवळ स्टेट बॅँकेच्या एटीएममधून पैसे काढले. तेथून महामार्गावर चढत असताना धुळेकडे भरधाव वेगाने जाणा:या कंटेरनची (क्र.सी.जी.04 जे.बी.6092) बुलेटला धडक बसली. त्यात बुलेटसह कुंदन टायरमध्ये अडकला. छाती, हात व डोक्याला मार लागल्याने त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.   

Web Title: The victim is the victim of a future doctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.