अनास्थेचे बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 01:48 PM2019-01-16T13:48:01+5:302019-01-16T13:52:35+5:30
प्रशासनाचे कोणतेही पूर्वनियोजन नव्हते
मिलिंद कुलकर्णी
नंदुरबार जिल्ह्यातील भूषा येथे नर्मदा नदीत बोट उलटून ५ बालकांसह सहा जणांचा झालेला मृत्यू हा प्रशासकीय अनास्थेमुळे झालेला आहे. आपत्ती व्यवस्थापनामध्ये दुर्घटना होऊ नये, यासाठी खबरदारी घेणे हा सगळ्यात महत्त्वाचा विषय असून दुर्देवाने त्याकडे प्रशासकीय यंत्रणेचे कायम दुर्लक्ष होत आलेले आहे.
मकरसंक्रांतीच्या पावनपर्वावर पवित्र स्रान आणि नदीपूजनाला आदिवासी बांधवांमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. पुरातन अशी ही परंपरा आहे. असंख्य भाविक या पर्वासाठी येतात, हे जगजाहीर आहे. असे असताना प्रशासकीय यंत्रणेने तेथे काय खबरदारी घेतली, यासंबंधी खरेतर गांभीर्याने माहिती घेतली गेली पाहिजे. मिळालेल्या माहितीनुसार, दुर्घटनाग्रस्त असलेली बोट ही नर्मदा विकास विभागाने भाडेतत्त्वावर घेतलेली होती. क्षमतेपेक्षा दुप्पट प्रवासी बसल्याने ही बोट नदीपात्रात उलटली आणि त्यामुळे ही दुर्घटना घडली, असा प्राथमिक निष्कर्ष काढला जातो. दुर्गम भागातील या दुर्घटनेचे जे व्हीडिओ प्रसारीत झाले आणि प्रत्यक्षदर्र्शींनी दिलेल्या माहितीनुसार, या पावन पर्वासाठी किमान ८-१० बोटी कार्यरत होत्या. या बोटीच्या टपावर लोक बसले होते. क्षमतेपेक्षा जास्त वजन झाल्याने बोट कलंडली आणि उलटी झाली. बंदिस्त बोट असल्याने मोठी माणसे पोहून बाहेर निघू शकली, परंतु लहान मुले आणि वृध्दांना निघता आले नाही.
या दुर्घटनेविषयी समोर आलेल्या माहितीवरुन, या पावन पर्वासाठी प्रशासनाचे कोणतेही पूर्वनियोजन नव्हते. नियोजन नसल्याने खबरदारीच्या उपाययोजनांचा प्रश्नच उद्भवत नाही. शहरी भागात गणेशोत्सव, नवरात्रोत्सवात मूर्ती विसर्जनावेळी पट्टीचे पोहणारी माणसे, पोलीस दल, गृहरक्षक दल, आपत्ती व्यवस्थापन दल अशी यंत्रणा तैनात असते. पण दुर्गम भाग, आदिवासी वस्तींपर्यंत आमचे प्रशासन पोहोचलेच नाही, याचा हा ठसठशीत पुरावा आहे. आदिवासींच्या उत्थानाच्या मोठ्या गप्पा करायच्या, पंतप्रधानांच्या आकांक्षित जिल्ह्यांत समावेश करायचा, मोठा निधी द्यायचा, पण आदिवासींच्या प्रथा, परंपरा, वारसा याविषयी अनभिज्ञ राहायचे, असेच प्रशासकीय यंत्रणेचे धोरण राहिले आहे. आदिवासी भागात दोन वर्षांचा कालावधी व्यतीत करण्याची सक्ती भारतीय प्रशासकीय सेवेच्या अधिकाऱ्यांना केल्याने ही मंडळी याठिकाणी येतात तरी, पण मनापासून किती अधिकारी काम करतात, हे त्यांचे त्यांनाच ठाऊक. आदिवासी बांधवांची अस्तंबा यात्रा, भोंगºया, होलिकोत्सव, दिवाळी अशी पारंपरिक सणांची खास वैशिष्टये आहेत. त्याची किमान माहिती करुन घेणे, हे सण आनंद आणि उत्साहाने साजरे होण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेचे सहकार्य उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी प्रशासनावर येते. प्रशासनाविषयी आत्मियता, ममत्व वाटावे, यासाठी हे स्वागतार्ह पाऊल आहे. लोकसहभागाशिवाय हगणदरीमुक्ती, साक्षरता, लसीकरण असे राष्टÑीय कार्यक्रम यशस्वी होत नाहीत, हा अनुभव लक्षात घेता आदिवासी बांधवांच्या जिव्हाळ्याच्या विषयांमध्ये प्रशासनाने पुढाकार घेऊन सहकार्य केले तर प्रशासन आणि जनतेमध्ये अंतर कमी होऊ शकेल. भूषा येथील दुर्घटनेचा एवढा बोध जरी प्रशासकीय यंत्रणेने घेतला तरी पुन्हा अशा दुर्घटना टाळता येऊ शकतील.