बळीराजाची चेष्ठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 07:21 PM2019-11-24T19:21:19+5:302019-11-24T19:21:44+5:30
विश्लेषण
विजयकुमार सैतवाल
जळगाव : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा मिळालेला मोबदला उत्पादन खर्चही न निघणारा असल्याने आता नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेले केंद्रीय समितीचे पथक येईल, त्यांच्याकडून पाहणी होऊन त्यांच्यापुढे आपली व्यथा मांडता येईल, या आशेवर असलेल्या बळीराजाच्या पदरी पथक अनेक ठिकाणी न पोहचल्याने निराशाच आली.
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेले केंद्रीय समितीचे दोन सदस्यीय पथक पहिल्या दिवशी जळगाव जिल्ह्यात पोहचले आणि अंधार पडल्याने हे पथक पारोळा तालुक्यातील केवळ मोंढाळे प्र.अ. येथे रस्त्यावरच पाच मिनिटे थांबून मार्गस्थ झाले. नियोजित दौऱ्यानुसार पारोळा व एरंडोल तालुक्यातील इतर ठिकाणी पथक न पोहचल्याने शेतकऱ्यांची घोर निराशा तर झालीच सोबतच संपूर्ण एरंडोल तालुक्यासह पारोळ््याचा उर्वरित भाग पाहणीपासून वंचित राहिला. या सोबतच दुपारपासून पथकाची प्रतीक्षा करीत असलेले शेतकरी रात्रीपर्यंत थांबूनही पथक न आल्याने शेतकºयांनी संताप व्यक्त केला. विशेष म्हणजे एरंडोल तालुक्यात पथकासाठी शेतरस्तेही तयार करण्यात आले, मात्र पथक न आल्याने अधिकारी, शेतकºयांची प्रतीक्षाही व्यर्थ ठरली. जिल्ह्यात २१ ते २९ आॅक्टोबर २०१९ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे १४६८ गावांमधील ६ लाख १ हजार ३०७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीच्या पाहणीसाठी केंद्र शासनाकडून समिती पाठविण्यात आली. केंद्रीय अर्थ मंत्रालयातील खर्च विभागाचे सल्लागार दिना नाथ व जयपूर येथील कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे संचालक डॉ.सुभाष चंद्रा यांचा समावेश असलेली समितीचा २२ रोजी दौरा सुरू झाल्यानंतर धुळे जिल्ह्यातील पाहणी करून या पथकाने संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात प्रवेश केला. मात्र तोपर्यंत अंधार पडला होता. त्यामुळे अंधारात पाहणी करणे शक्य नव्हते. परिणामी पुढील पाहणी टळणार हे निश्चित होते. झालेही तसेच व या पथकाने केवळ पारोळा तालुक्यातील मोंढाळे प्र.अ. येथे रस्त्यावरच पाच मिनिटे थांबून संवाद साधला आणि काढता पाय घेतला. त्यामुळे येथे शेतकºयांचा अपेक्षाभंग झाला. पथक मुळात उशिरा पोहचल्याने अंधारात नुकसानीचा अंदाज येणे शक्य नव्हते. त्यामुळे पथकाने एकाच गावात थांबून कापसाची पाहणी केली. अंधार पडल्याने शेतातील नुकसानीचे काय समजणार त्यामुळे हे पथक जळगावी मुक्कामासाठी पोहचले.
अंधार पडल्याने पारोळ््यातील उर्वरित दोन गावांची व एरंडोल तालुक्यातील ३ गावांची पाहणीच होऊ शकली नाही. दुसºया दिवशीही या तालुक्यात पाहणी झाली नाही. २३ रोजी नियोजित दौºयानुसार पाहणी करणार असल्याचेही पथकाच्यावतीने सांगण्यात आले होते. मात्र दुसºया दिवशीही बळीराजा प्रतीक्षाच करीत राहिला. हे पथक २३ रोजी सकाळी ८.३० वाजता शिरसोलीमार्गे पाहणीसाठी रवाना होणार होते. यामध्ये जळगाव तालुक्यातील ३, पाचोरा तालुक्यातील ४, भडगाव तालुक्यातील २, चाळीसगाव तालुक्यातील ३ गावांमध्ये पिकांच्या नुकसानीची पाहणी करून औरंगाबादमार्गे अहमदनगरकडे रवाना होणार असल्याचे नियोजन होते. मात्र २३ रोजी सकाळी आठ वाजेपासून शिरसोली येथे प्रतीक्षा करीत शेतकरी थांबले होते. मात्र पथक तेथे सकाळी साडेदहा वाजता पोहचले व काही क्षणात तेथून निघून गेले.
या समितीच्या दौºयादरम्यान तलाठी, कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक आदींसह तहसीलदार यांनी गावात अगदी पहाटेपासूनच हजेरी लावली होती़ दुपारी दोन वाजेपासून शेतकरी व हे अधिकारी शेतांच्या बांधावर थांबून होते़ सोबतच पारोळा व एरंडोल दोन्हीही तालुक्यात सायंकाळी सात पर्यंत सर्व अधिकारी व शेतकरी थांबून होते, मात्र पथक आले नाही. अखेर हे सर्व निराश होऊन परतले़ पथक थेट शेतात येणार असल्याने शेतररस्त्यांवरील काटे हटविणे, रस्ते स्वच्छ करून त्यावर मुरूम टाकण्याचे काम काही शेतकºयांनी केले होते़ मात्र पथक तर आलेच नाही सोबत शेतकºयांना आर्थिक फटका बसला. अधिकारी व कर्मचारी दिवसभर थांबून असल्याने त्यांची अन्य कामेही खोळंबली होती़
एकूणच काय तर शेतकºयांच्या बांधावर केंद्रीय समिती सदस्य न पोहचल्याने बळीराजाच्या पदरी अखेर निराशाच आली.