शिरसोलीतील बाधिताच्या पत्नीचे रुग्णालयातून रात्री पलायन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 01:18 PM2020-05-28T13:18:49+5:302020-05-28T13:19:58+5:30
शिरसोली ता. जळगाव : शिरसोली येथील बारी नगरात बुधवारी बाधित रुग्ण आढळल्यानंतर त्याची पत्नी व इतर सात नातेवाईकांना बुधवारी ...
शिरसोली ता. जळगाव : शिरसोली येथील बारी नगरात बुधवारी बाधित रुग्ण आढळल्यानंतर त्याची पत्नी व इतर सात नातेवाईकांना बुधवारी रात्रीच कोविड रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले होते. मात्र या महिलेने रात्री १० वाजेच्या सुमारास शिरसोली गाठल्याने अधिकच भिती पसरली. सकाळी हा प्रकार सकाळी पोलीस पाटील व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लक्षात आला. त्यांनी लागलीच रुग्णवाहिका बोलावून या महिलेची कोविड रुग्णालयात रवानगी केली. ही महिला रात्री घरी कशी परतली याबाबत चर्चा सुरु झाली आहे.
बुधवारी गावात कोरोना बाधित आढळल्याची वार्ता पसरताच खळबळ उडाली. दरम्यान कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून औषधी दुकाने, दवाखाने व दुध पुरवठा वगळता सर्व दुकाने गुरुवारपासून तीन दिवस बंद राहणार आहेत. दुकान उघडल्यास ग्रामपंचायतीकडून कठोर कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत गावात दवंडी देण्यात आली आहे. पोलिसांचा बंदोबस्त वाढविल्याने गावात शुकशुकाट आहे.
दरम्यान कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आशावर्कर ह्या गावात घरोघर जाऊन कुणाला खोकला,ताप व काही त्रास होतो आहे का याचा सर्वे करीत आहेत. तसेच बाहेर गावाहून येणा-या जाणा-यांची चौकशी केली जात आहे.
गुरुवारी सकाळी फवारणी करण्यात आली. यावेळी पंचायत समिती सभापती नंदलाल पाटील व पोलीस पाटील शरद पाटील, आरोग्यविभागाचे डॉ. निलेश अग्रवाल, प्रशांत गर्गेकर, अनिल महाजन, एम,यु वानखेडे, नीलेश चौधरी,सलिम पिंंजारी ,गोपाल बारी, प्रमोद रगरे उपस्थित होते.