विघ्नहर्ता गणरायाचे उत्साहात आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:18 AM2021-09-11T04:18:15+5:302021-09-11T04:18:15+5:30

जळगाव : १४ विद्या व ६४ कलांचा अधिपती अशा विघ्नहर्ता लाडक्या गणरायाचे शुक्रवारी सर्वत्र मोठ्या हर्षोल्लासात आगमन झाले. १० ...

Vighnaharta Ganaraya's arrival in excitement | विघ्नहर्ता गणरायाचे उत्साहात आगमन

विघ्नहर्ता गणरायाचे उत्साहात आगमन

Next

जळगाव : १४ विद्या व ६४ कलांचा अधिपती अशा विघ्नहर्ता लाडक्या गणरायाचे शुक्रवारी सर्वत्र मोठ्या हर्षोल्लासात आगमन झाले. १० दिवसांचा पाहुणा असलेल्या बाप्पाच्या आगमनाची उत्कंठा एकीकडे शिगेला पोहोचली असताना दुसरीकडे यंदाही कोरोनाचे सावट असल्याने सर्व नियमांचे पालन करीत लहान-मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांसह घराघरांत गणरायाचे स्वागत करण्यात येऊन विधिवत स्थापना करण्यात आली. विविध साहित्य खरेदीसाठी गुुरुवारनंतर शुक्रवारीदेखील सकाळपासूनच दिवसभर बाजारपेठत लगबग दिसून आली. अजिंठा चौफुली, गणेश कॉलनी चौक, बहिणाबाई उद्यान चौक, टॉवर चौक, गिरणा टाकी परिसर इत्याही ठिकाणी मूर्ती व पूजेचे साहित्य खरेदीसाठी गणेशभक्त वळले.

आनंदाची पर्वणी घेऊन येणाऱ्या विघ्नहर्ता गणपती बाप्पाच्या आगमनामुळे सर्वत्र चैतन्याचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे गणेश चतुर्थीचा मुहूर्त साधण्यासाठी विविध वस्तूंच्या खरेदी करण्यासाठी बाजारात उत्साह राहिला. दुचाकी, कार, एलईडी, होम थिएटर, वॉशिंग मशिन यांना चांगली मागणी राहिली.

कोरोनाचे सावट तरीही उत्साह कायम

गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही गणेशोत्सवादरम्यान कोरोनाचे सावट आहे. त्यात प्रशासनाने गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे निर्देश दिले असल्याने मंडळांच्या ठिकाणी मोजक्या जणांच्या उपस्थितीत गणरायाची स्थापना करण्यात आली. बाप्पाच्या आगमण मिरवणुकीला परवानगी नाकारल्याने मिरणुका काढल्या गेल्या नसल्या तरी अनेकांनी बाप्पाला डोक्यावर घेत तर बहुतांश जणांनी वाहनांमधून गणरायाचा जयघोष करीत मंडळस्थळी व घरी नेले. कोरोनाचे सावट असले तरी गणेशभक्तांमध्ये मोठा उत्साह कायम असून सर्वांनीच अत्यंत उत्साहात लाडक्या बाप्पाचे स्वागत केले.

खरेदीसाठी वाढली गर्दी

कोरोनाचे सावट असल्याने गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. मात्र तरीदेखील मूर्ती, पूजा साहित्य खरेदीसाठी अनेक ठिकाणी गर्दी झाली होती. सर्वांचा आवडीचा सण असल्याने व खरेदी वेळेत होण्यासाठी सकाळपासून खरेदीस नागरिक बाहेर पडले. त्यामुळे गर्दी वाढत गेली.

Web Title: Vighnaharta Ganaraya's arrival in excitement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.