ग्रामदक्षता समिती करणार कोरोना विरोधी लढ्यात मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:17 AM2021-04-22T04:17:13+5:302021-04-22T04:17:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव सध्या ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे आता जिल्हा प्रशासनाने ग्राम ...

The Village Vigilance Committee will help in the fight against Corona | ग्रामदक्षता समिती करणार कोरोना विरोधी लढ्यात मदत

ग्रामदक्षता समिती करणार कोरोना विरोधी लढ्यात मदत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव सध्या ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे आता जिल्हा प्रशासनाने ग्राम दक्षता समितीचीही मदत कोरोनाविरोधी लढ्यात घेतली आहे. पहिल्या लाटेतही ग्राम दक्षता समितीने प्रशासनाला मदत केली होती. आता पुन्हा नियम पाळण्याचे आणि त्या दृष्टीने ग्रामरक्षक दलाने काय करावे, याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांनी यात बुधवारी दहा तालुक्यांचा आढावा घेतला. त्यानंतर आदेश पारित केले.

या आदेशात म्हटले की, जनजागृती करावी, कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने याआधी प्रसिद्ध केलेल्या विविध साहित्याची मदत घेऊन गावात जागृती करावी. प्रत्येकाला स्वच्छतेचे तीन नियम समजावून सांगावे. तसेच पालन करण्यास प्रोत्साहित करावे. लग्न, अंत्यविधी, वाढदिवस व इतर सामाजिक सोहळे तूर्तास रद्द करण्याबाबत गावकऱ्यांना विनंती करावी. आवश्यक असल्यात कमीत कमी संख्येत घरगुती सोहळे होतील. याकडे बारकाईन लक्ष द्यावे, तसेच नियम मोडल्यास होणाऱ्या कारवाईची जाणीव नागरिकांना करून द्यावी.

माझे कुटुंब माझी जबाबदारी या माध्यमातून गावातील व्यक्तींनी नियुक्त केलेल्या पथकाला योग्य ती माहिती द्यावी, यासाठी उपाययोजना करावी तसेच लक्षणे असणाऱ्यांना तातडीने तपासणी सुचवावी. तसेच रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांच्या चाचण्या केल्या जातील. याकडे लक्ष द्यावे.

प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ब्रेक द चेनच्या शासनाच्या आदेशाचे कठोर पालन होते की नाही याकडे लक्ष द्यावे.

गावात होणाऱ्या चाचणी शिबिरांना सहकार्य करावे. प्रतिबंधित क्षेत्राची अंमलबजावणी योग्य रितीने होणे आवश्यक आहे.

तसेच गावात सॅनिटायजेशनची वेळोवेळी कार्यवाही करावी.

गावातील कोरोना संसर्ग, नियमांची अंमलबजावणी तपासणी प्रतिबंधात्मक उपाय याची माहिती वेळोवेळी द्यावी.

त्या आदेशावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील, पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी स्वाक्षरी केली आहे.

Web Title: The Village Vigilance Committee will help in the fight against Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.