शिक्षक बदलीमुळे ग्रामस्थ संतप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 01:35 AM2018-06-16T01:35:36+5:302018-06-16T01:35:36+5:30
अमळनेर तालुक्यातील मठगव्हाण येथील घटना : बदली रद्द व्हावी यासाठी बेमुदत शाळा बंद
मुंगसे, ता.अमळनेर : जिल्हा परिषदेच्या सावखेडा केंद्र अंतर्गत येणाऱ्या मठगव्हाण जि. प. मराठी शाळेतील शिक्षक दिनेश मोरे यांची झालेली बदली रद्द करण्यात यावी या मागणीसाठी शालेय ग्रामपंचायतीच्या पदाधिकाºयांसह ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले.
नवीन शैक्षणिक वर्षातील शुक्रवारी शाळेचा पहिला दिवस होता आणि या शाळेतील शिक्षक दिनेश मोरे यांची बदली झाल्याचे ग्रामस्थांना समजले. यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले. शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष एकनाथ श्रीराम पवार यांच्यासह सर्व सदस्य, पालक व सरपंच तसेच ग्रामस्थांनी सकाळी दहाला शाळेचे कुलूप उघडू दिले नाही. शिक्षक बदली रद्द केल्याशिवाय आम्ही शाळा सुरू होऊ देणार नाही, असा पवित्रा घेतला.
या घटनाक्रमानंतर केंद्रप्रमुख सुरेश पाठक यांनी घटनास्थळी वेळीच भेट देऊन ग्रामस्थांशी व शालेय व्यवस्थापन समिती यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधला व समज दिली. परंतु गावकरी व समिती ऐकून घेण्याच्या तयारीत दिसून आले नाहीत. त्यांनी गटशिक्षणाधिकाºयांंच्या भेटीशिवाय आम्ही शाळा उघडू देणार नाहीत, असा निर्णय घेतला.
त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख शाळेच्या पटांगणात बसून होते.
दरम्यान, शाळेच्या पहिल्या दिवशी इयता पहिलीचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यादरम्यान दुपारी दोन वाजता अमळनेरचे गटशिक्षणाधिकारी अशोक बिºहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विस्तार अधिकारी पी.डी. धनगर यांनी ग्रामस्थांशी सविस्तर चर्चा केली. त्यांच्या भावना समजून घेतल्या. नंतरही ग्रामस्थांनी बेमुदत शाळा बंद आंदोलन मागे घेतले नाही. विद्यार्थी, शिक्षक, केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी दिवसभर शाळेला कुलूप असल्याने आवारात बसून होते.