मद्य दुकानास संमतीच्या ठरावाने ग्रामस्थ संतप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 12:53 AM2017-09-16T00:53:03+5:302017-09-16T00:54:10+5:30
जळगाव जिल्ह्यातील तोंडापूर येथील प्रकार
लोकमत ऑनलाईन तोंडापूर, जि. जळगाव, दि. 15 : एकीकडे दारूबंदीसाठी ग्रामसभांमध्ये ठराव होत असताना, दुसरीकडे दारू दुकान सुरू करण्याचा ठराव ग्रामपंचायतीनेच बहुमताने मंजूर केला. यातून गटविकास अधिका:यांच्या आदेशाला तोंडापूर (ता.जामनेर) येथील ग्रामपंचायतीने केराची टोपली दाखविल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. गावापासून एक किलोमीटर अंतरावर हे देशी दारूचे दुकान होऊ घातले आहे. सूत्रांनुसार, तोंडापूर ग्रामपंचायतीने गेल्या बैठकीत गावात देशी दारू दुकान सुरू करण्याचा ठराव केला होता. यावर गावात संतप्त प्रतिक्रिया उमटून हा ठराव रद्द करण्याची मागणी ग्रामस्थांनी ग्रामसभेत गटविकास अधिका:यांकडे केली होती. गटविकास अधिका:यांनी तोंडापूर ग्रामपंचायतीला देशी दारू दुकानाचा ठराव रद्द करण्याचे आदेश दिले. त्यानुसार कार्यवाही न करता पूर्वीचा ठराव कायम ठेवत गटविकास अधिका:यांच्या आदेशाला सरपंचासह आठ सदस्यांनी केराची टोपली दाखविली. यांनी केला विरोध ग्रामपंचायत सदस्य नाना जाधव, अविनाश ठाकूर, चैताली पाटील, मच्छिंद्र खिवसरा, अपूर्वाबाई जिरी, उषा गवळी यांनी दोन दिवसांपूर्वी झालेल्या मासिक बैठकीत या ठरावाला विरोध केला. मात्र बहुमत असल्याने ठराव संमत झाला. सरपंच प्रकाश सपकाळ, उपसरपंच अब्दुल हमीद, कडूबा पोटदुखे, मालती लोखंडे, जोहराबाई कुरेशी, रज्जाक खाटीक यांच्यासह 11 सदस्यांनी हे देशी दारू दुकान सुरू ठेवण्यास हरकत नसल्याच्या ठरावाला बहुमताने मंजुरी दिली. या प्रकारामुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.