मुले चोरणाऱ्या टोळीच्या संशयावरून सहा जणांना ग्रामस्थांनी दिला चोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 01:31 AM2018-06-16T01:31:12+5:302018-06-16T01:31:12+5:30
चाळीसगाव तालुक्यातील विसापूर येथील घटना : प्रतिबंधात्मक कारवाई, गैरसमजातून घडला प्रकार
वरखेडे, ता.चाळीसगाव (जि.जळगाव) : वरखेडे येथून जवळ असलेल्या विसापूर, ता.चाळीसगाव येथे मुले पळवणाºया टोळीचा संशयित असल्याच्या गैरसमजातून ग्रामस्थांकडून मुक्ताईनगर व बुलडाणा येथून आलेल्या भिक्षुकीनांना चांगलाच चोप देण्यात आला.
प्राप्त माहितीनुसार, १५ जून रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास विसापूर गावात भिक्षुकी आले. दोन मुले खेळत असताना त्यांनी, मुलांना दोन हजार रुपयांची नोट दाखवून, हातवारे करून गाडीजवळ बोलवले.
मात्र भिक्षुकी हे पुरुष होते व त्यांनी पोषाख मात्र महिलांचे घातलेले होते. त्यामुळे मुले घाबरली व त्यांनी आरडाओरड केली. त्यावरून ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांना वाटले की, ही मुले पळवणारी टोळीच आहे.
त्यामुळे मग काय जो आला त्याने हातसफाई करीत भिक्षुकांना चांगला चोप दिला.
या घटनेबाबत मेहणबारे पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरसाठ व पोलीस दाखल झाले. संशयितांना ताब्यात घेण्यात आले.
भीमराव गोपाळ साळुंखे (वय ४४), मंगल शिंदे (४४), गणेश शिवाजी साळुंखे (२१) तिन्ही रा. मुक्ताईनगर, सुरेश तान्हाजी साळुंखे (४०), भवानी भगवान साळुंखे (४०), आकाश तान्हाजी पिंगली (४२) तिन्ही रा.बुलडाणा यांच्यावर कलम १०९ प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
आमदार पाटील यांनीही कानशिलात लगावली
आमदार उन्मेश पाटील घटनास्थळी तत्काळ पोहचले व संपूर्ण माहिती जाणून घेत त्यांचा राग अनावर झाला. ग्रामस्थांप्रमाणे त्यांचादेखील गैरसमज झाला आणि त्यांनीदेखील भिक्षुकींच्या मुखात लगावली. मात्र विषयाची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ग्रामस्थांची समजूत घातली.
हे लोक भिक्षुकी आहेत. त्यांची चौकशी केली. ते मुक्ताईनगर व बुलडाणा येथील रहिवासी आहेत. त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. -दिलीप शिरसाठ, सहाय्यक पोलीस निरीक्षक, मेहुणबारे पोलीस ठाणे