सात्रीचे ग्रामस्थ अजूनही सोसताहेत हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 04:59 PM2019-09-25T16:59:16+5:302019-09-25T16:59:56+5:30

पाण्याचा जोर वाढलेलाच : शेकडो वर्षांसून करतात हा जीवघेणा प्रवास

 The villagers of Satri are still suffering | सात्रीचे ग्रामस्थ अजूनही सोसताहेत हाल

सात्रीचे ग्रामस्थ अजूनही सोसताहेत हाल

Next

अमळनेर : ऐतिहासिक प्रगणे डांगरीच्या नदीपलीकडील सात्री गाव दरवर्षी पावसाळ्यात उपजीविकेसाठी शेकडो वर्षांपासून जीवघेणा प्रवास करीत आहे. पुनर्वसित गाव म्हणून शासनाने एकीकडे विकास थांबवला आहे तर दुसरीकडे पुनर्वसन प्रक्रिया देखील १० वर्षांपासून लांबली आहे. शासनाने प्रतिबंधक धरण क्षेत्र जाहीर करून नदीच्या पाण्यात उतरण्यास मनाई केली, तर जीवन जगण्यासाठी मात्र पाण्यात उतरण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. अशी विसंगत परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र ‘लोकमत’ने घटनास्थळी भेट दिल्यानंतर उघडकीस आले.
२५ रोजी सकाळी ‘लोकमत’ने सात्री येथे भेट देण्याचा प्रयत्न केला असता बोरी नदीच्या पुरामुळे या गावाला पोहचताच आले नाही. डांगरी या गावात थांबूनच परिस्थिती बघता आली. येथे येण्यासाठी दुसरा पयार्यी रस्ता कलाली निंभोरा गावाकडून आहे. मात्र तिथेही तापी व चिखली, बोरी नदीचे खोरे असल्याने नाल्यातून पावसाळ्यात चालणे अशक्य आहे.
गावातील काही दूध उत्पादक अमळनेर व इतर खेड्यांवर दूध आणण्यासाठी आणि राजेंद्र ठाकरे नावाचा आजारी ग्रामस्थला दवाखाण्यात नेण्यासाठी एका खाटेवर मोठा ट्यूूब आणि प्लॅस्टिक कॅन बांधून ती पाण्यातून आणत असताना गावातील चार जण नजरेस पडले. तर अजय भिल नावाचा शेतमजूर हा डांगरी शिवारातील शेती मशागत करण्यासाठी वखर, दुशेर आणि बैलांचे साहित्य नदी पात्रातून पोहत आणताना दिसला. एक एक साहित्य आणि बैलांना नदी पार करून आणण्यासाठी अजयने चार फेऱ्या केल्या. अनेकदा ग्रामस्थांना डांगरी गावातच कपडे कोणाकडे तरी ठेवून पोहत घरी जावे लागते. मनोहर बोरसे या दूध विक्रेत्याने सांगितले की, पावसाळ्यात डांगरी माध्यमिक शाळेत जाणा-या मुलांना आता किती दिवस शाळाबाह्य राहावे लागेल याची शाश्वती नाही. प्राथमिक शिक्षक देखील गावात येऊ शकत नसल्याने मुलांचे शिक्षण रामभरोसेच आहे. गावात एकही डॉक्टर नसल्याने रुग्णांना जास्त पूर असल्यास तीन-तीन दिवस वाट बघावी लागते. दैनंदिन उपजीविकेसाठीचे अन्न धान्य संपले की उसनवारी करून काम धकवावे लागते, अशी व्यथा त्यांनी मांडली. अवघ्या शंभर मीटरवर असलेले डांगरी गाव त्या काळातील प्रगणे वसूल करणारे मुख्य गाव होते. तर क्रांतिकारक उत्तमराव पाटील व लीलाताई पाटील, माजी मंत्री शिवाजीराव पाटील, अभिनेत्री स्मिता पाटील यांचे हे गाव. मात्र त्या काळापासून सात्री हे शेजारील गाव सुविधांपासून वंचित आहे.
डांगरी आणि सात्री गावांमधील नदीचे क्षेत्र हे पाडळसरे धरणाच्या बॅक वॉटर क्षेत्रात येते. दोन्ही गावे पूर्ण बुडीत क्षेत्रात असल्याने शासनाने हा भाग प्रतिबंधक क्षेत्र म्हणून जाहीर केला. तसेच धरण परिसरात पाण्यात उतरण्यास आणि पोहण्यास सक्त मनाई आहे. तसा फलक डांगरी गावाच्या प्रवेशद्वारावर लावला आहे. येथूनच सात्रीला जावे लागते. त्यामुळे पाण्यात उतरून पोहण्याशिवाय ग्रामस्थांना पर्याय नाही.
बोरी नदीच्या सततच्या पुरामुळे रेशनचे धान्य सात्रीपर्यंत पोहचवता येत नाही. जिल्हा पुरवठा अधिका?्याशी चर्चा करून धान्य डांगरीपर्यंत पोहचविले जाईल. तेथून काहीतरी व्यवस्था करून सात्रीपर्यंत धान्य ग्राहकांपर्यंत पोहचविले जाईल.
-मिलिंद वाघ, तहसीलदार, अमळनेर

९ सप्टेंबरपासून गावातील १७ ते १८ घरे पडल्याची माहिती मिळाली आहे. मात्र सततच्या पावसामुळे सात्री गावाला पंचनाम्यासाठी पोहचता येत नाही. तसा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिला आहे.
- वाल्मिक पाटील, तलाठी

हा खडतर प्रवास रोजचाच...
खाटेवरून एखाद्या रुग्णाला अथवा व्यक्तीला आणण्यासाठी खाट डोक्यावर धरून नदीकाठच्या चिखल-काटे असलेल्या खोºयातून प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला १ किमी अंतर जावे लागते. नंतर चार जण प्रवाहाच्या दिशेने पोहत पलीकडच्या तीरावर खाट पोहचवितात. परत पलीकडे खाट डोक्यावर धरून पुन्हा तेवढेच अंतर प्रवाहाच्या दिशेने कापून गावात परतावे लागते. अनवाणी जावे लागत असल्याने पायाला सरपटणारे प्राणी, घातक कीटक चावा घेण्याची भीती असते.

Web Title:  The villagers of Satri are still suffering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.