दूषित पाण्याने ग्रामस्थ त्रस्त
By admin | Published: April 6, 2017 12:46 AM2017-04-06T00:46:31+5:302017-04-06T00:46:31+5:30
आरोग्य धोक्यात : कर्णफाटावासीयांचे हाल थांबेना, प्रशासनाचे दुर्लक्ष, जनता संतप्त
जामनेर : ‘पिण्याचे पाणी द्या’, अशी मागणी करीत जलसंपदामंत्र्यांच्या घरावर रिकाम्या घागरी घेऊन आलेल्या महिलांना वाकडी ग्रामपंचायतीने पुरविलेले पाणी अत्यंत दूषित असल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दूषित पाण्याची तक्रार पंचायत समिती कार्यालयापर्यंत पोहोचवूनदेखील कुणीही अधिकारी वा पदाधिकारी गावापर्यंत न पोहोचल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.
गेल्या रविवारी कर्णफाटा येथील महिला पिण्याच्या पाण्याच्या मागणीसाठी रिकामे हंडे घेऊन मंत्री गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी धडकल्यानंतर त्यांनी तातडीने नायब तहसीलदार परमेश्वर कासुडे यांना गावात पाठविले. यानंतर वाकडी ग्रामपंचायतीने वाकडी धरणावरून कर्णफाट्यासाठी पाणी सोडले. हे पाणी ज्या टाकीत सोडले गेले तीच मुळात गळकी आहे.
वाकडी ग्रामपंचायतीने धरणाजवळील विहिरीचा उपसा करण्यासाठी ते पाणी पाईपलाईनने पाण्याच्या टाकीत व गावाजवळ असलेल्या जुन्या विहिरीत सोडले. उपसा होत असलेले दूषित पाणी पाण्याच्या टाकीत सोडले गेल्याने हेच पाणी ग्रामस्थांना प्यावे लागले. त्यामुळे गावातील महिला, लहान मुलांना वांत्या व जुलाबाचा त्रास व्हायला लागला. ही माहिती कर्णफाटा गावातील रवींद्र माने यांनी बुधवारी गटविकास अधिकाºयांना दिली.
एकीकडे अशी बिकट परिस्थिती असताना वाकडी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सांगतात की, सोडलेले पाणी पिण्यायोग्य नसल्याने नागरिकांनी ते वापरू नये, अशी दवंडी दिली.
मंत्र्यांच्या निवासस्थानी पिण्याचे पाणी मागण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांना शुद्ध पाणीपुरवठा करण्याऐवजी ग्रामपंचायतीने विहिरीचा उपसा करून ते दूषित पाणी टाकीत सोडून नागरिकांच्या जीवाशी खेळच चालविला. याउपरही ग्रामसेवक म्हणतात, आम्ही गुरुवारी गावास पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करू. ग्रामसेवकांच्या या भूमिकेवरही ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. (वार्ताहर)
वाकडी व कर्णफाटा गावांना तोंडापूर धरणातून जलवाहिनीने पाणीपुरवठा करण्यासाठी आजपर्यंत तीन योजना राबविल्या गेल्या. कोट्यवधीचा खर्च झाला. मात्र कर्णफाटा येथील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. कर्णफाटा गाव वाकडी ग्रुप ग्रामपंचायतीशी जोडलेले असून सरपंचांचे याकडे पूर्ण दुर्लक्ष आहे, असा ग्रामस्थांचा आरोप आहे. दरम्यान, सरपंचांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
सुमारे ४०० लोकसंख्येच्या कर्णफाटा गावासाठी एकात्मिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत बांधण्यात आलेली ही पाण्याची टाकी. मात्र ती बांधकाम झाल्यापासून कोरडीच आहे. ग्रामस्थांच्या दृष्टीने ही टाकी केवळ ‘शोपीस’सारखी ठरत आहे.
मंत्र्यांकडे पाणी मागण्यासाठी गेल्यानंतर जे पाणी प्यायला मिळाले ते अत्यंत दूषित असल्याने त्वचेचे आजार झाले. आमची सरकारला हात जोडून विनंती आहे की, आम्हाला काही नको, फक्त प्यायला शुद्ध पाणी द्या.
-सिंधूबाई पाटील, ग्रामस्थ, कर्णफाटा.
वाकडी ग्रामपंचायतीने पिण्यासाठी सोडलेल्या दूषित पाण्यामुळे वांत्या व जुलाबाचा त्रास झाला. चार दिवस उलटले तरी गावकºयांना पिण्याचे पाणी मिळू शकले नाही. आम्हाला काही नाही मिळाले तरी चालेल; पण प्यायला पाणी द्या.
-शांताबाई माने, ग्रामस्थ, कर्णफाटा.
कर्णफाटा येथील राष्टÑीय पेयजल योजनेचे काम अपूर्ण आहे. वाकडीपर्यंत काम पूर्ण झाले असून येत्या १५ दिवसात कर्णफाट्यापर्यंतचे काम पूर्ण केले जाईल.
-एम.जी.सराफ,
उपअभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा, जि.प. जळगाव.