जिल्हा वार्षिक योजनेतून शेतशिवार बहरण्यासह गावे लखलखणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:17 AM2021-04-27T04:17:25+5:302021-04-27T04:17:25+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यातील विजेची समस्या समूळ मिटविण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्ह्यातील वीज उपकेंद्र मंजुरीला प्राधान्य ...

Villages will flourish with the development of agricultural lands from the district annual plan | जिल्हा वार्षिक योजनेतून शेतशिवार बहरण्यासह गावे लखलखणार

जिल्हा वार्षिक योजनेतून शेतशिवार बहरण्यासह गावे लखलखणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यातील विजेची समस्या समूळ मिटविण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्ह्यातील वीज उपकेंद्र मंजुरीला प्राधान्य देणार असून मागील वर्षा प्रमाणे या वर्षीही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी वापरासाठी व पाणीपुरवठा योजनेच्या वितरणासाठी अडचण येऊ नये म्हणून यंदा २२ कोटी रूपयांची विजेची कामे मंजूर केल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. विशेष म्हणजे मागील वर्षी १४ कोटी तर यावर्षी २२ कोटी असा २ वर्षात विक्रमी म्हणजे ३६ कोटींच्या कामांना मान्यता मिळाली आहे. यामुळे शेतशिवार बहरून गावेदेखील लखलखण्यास मदत होईल.

जिल्ह्यात वीजविषयक समस्या मोठ्या प्रमाणात उद‌्भवल्या होत्या. यात शेतीचे पंप वारंवार जळणे, जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा करण्यासाठी विजेची समस्या उदभवणे, घरगुती, शेती पंप व पाणीपुरवठा सुरू ठेवण्यासाठी पूर्ण दाबाने वीज पुरवठ्याचा अभाव या समस्यांचा प्रामुख्याने समावेश होता. यामुळे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी वारंवार नवीन ट्रान्सफाॅर्मर बसविण्याबाबत मागणी होत होती. याच्या जोडीला भुसावळ ट्रामा सेंटरला स्वतंत्र ट्रान्सफाॅर्मर बसविणे, खराब झालेले वीज खांब बदलून मिळणे, अपघात होऊ नये म्हणून केबलची कामे करण्याबाबत वारंवार मागणी होत होती. या अनुषंगाने जिल्ह्यातील आमदार, खासदार व इतर लोकप्रतिनिधी गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी करून डीपीडीसीच्या बैठकीत याबाबत निधीवाढीसाठी चर्चा झाली होती. याची दखल घेऊन पालकमंत्री पाटील व जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी २२ कोटी निधी मंजूर केल्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांच्या सर्वात महत्त्वाच्या समस्येचे निराकरण होणार आहे.

२०१८-१९ पर्यंत जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत या कामांसाठी वर्षाला केवळ २ कोटी रुपये मंजूर होत होते. मात्र मागील वर्षापासून पालकमंत्री पाटील यांनी मागील वर्षी १९४ कामांसाठी १६ कोटी ५५ लाख निधी मंजूर करून ऊर्जा विभागाकडे वितरित केला होता. तर यावर्षी तब्बल ४३७ कामांसाठी २१ कोटी ९२ लक्ष ६६ हजारांचा निधी मंजूर केला असून मुदतीत व दर्जेदार काम करण्याचे जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले.

तालुकानिहाय मंजूर कामे

तालुका - मंजूर कामे - निधी (लाखात)

अमळनेर - १३- ६४.१०

भडगाव - ११ - ५२.७९

पाचोरा - ४० - २१७.९२

भुसावळ -३९ - २१२.५५

बोदवड - ५६ - २८२. ७९

मुक्ताईनगर - १७ - ६५.०२

चाळीसगाव - ११- ५१.०९

चोपडा - २९ - १७२.१३

धरणगाव - ५५ - २१६.०४

जळगाव - ५२ - २७६.१०

जामनेर - ३९ - २१२.५४

एरंडोल - १३ - ७४.५२

पारोळा - ९ - ४४.६३

रावेर- ४१ - १९१.१६

यावल - १५ - ६२.५३

शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा सर्वात महत्त्वाचा घटक असून पुरेशा विजेअभावी शेतकऱ्यांची कोट्यवधीची हानी होत असते. आता २ वर्षात तब्बल ३६ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता देण्यात आली असून याचा बळीराजाला लाभ होणार आहे, असा विश्वास पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.

Web Title: Villages will flourish with the development of agricultural lands from the district annual plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.