कोरोना नियमावलीचे उल्लंघन; खासदार, आमदाराविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 07:41 PM2021-12-30T19:41:33+5:302021-12-30T19:42:55+5:30
शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या अनावरणा कार्यक्रमानंतर दुपारी दोन ते चार वाजेदरम्यान जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेस परवानगीपेक्षा जास्त जनसमुदाय जमा केला,
जळगाव - जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन झाले. या प्रकरणी भाजपचे खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण, नगरपालिकेच्या नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांच्यासह चार ते पाच हजारांच्या जमावांविरोधात चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण व लोकार्पण बुधवारी चाळीसगाव येथे झाले.
शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या अनावरणा कार्यक्रमानंतर दुपारी दोन ते चार वाजेदरम्यान जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेस परवानगीपेक्षा जास्त जनसमुदाय जमा केला. अटी -शर्तीचा भंग केला व सोशल डिस्टनसिंगचे पालन केले नाही, म्हणून खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, भाजपा शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, राजेंद्र चौधरी, संजय रतनसिंग पाटील, संजय भास्कर पाटील, नितीन पाटील, शेख चिरागउद्दीन रफिक उद्दोन शेख, चंद्रकांत तायडे, फकिराबेन मिर्झा, कैलास पाटील यांच्यासह चार ते पाच हजाराच्या जमावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, पोलिस नाईक पंढरीनाथ पवार यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कापडणीस करीत आहेत.