संचारबंदीचे उल्लंघन, बीअर बारसह दोन दुकानांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:12 AM2021-07-03T04:12:37+5:302021-07-03T04:12:37+5:30
भुसावळ : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शासनाने सायंकाळी ४ नंतर संचारबंदी लागू केली आहे. मात्र संचारबंदीचे उल्लंघन ...
भुसावळ : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शासनाने सायंकाळी ४ नंतर संचारबंदी लागू केली आहे. मात्र संचारबंदीचे उल्लंघन करीत खडका चौफुलीवरील ग्रीन व्ह्यू बीअर बारसह दोन दुकाने उघडी होती. डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी १ जुलै रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास बारवर १० हजार, तर दोन्ही दुकानदारांवर अनुक्रमे दीड व दोन हजारांची दंडात्मक कारवाई केली.
कोरोनाची तिसरी लाट येऊ नये याकरिता पोलीस प्रशासन आटोकाट प्रयत्न करीत आहे. असे असतानादेखील दुकानदार व नागरिक खुलेआम नियमांचे उल्लंघन करताना दिसून येत आहेत. १ जुलै रोजी रात्री उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांच्यासह कर्मचाऱ्यांचा ताफा अमरदीप चौक, रजा टॉवर, खडका रोड या ठिकाणी गस्त घालत होते. तेव्हा खडका चौफुलीवरील हॉटेल ग्रीन व्ह्यू बीअर बार हे सुरू असल्याचे निदर्शनास आले. वाघचौरे यांनी संबंधित व्यवस्थापकाला तंबी देत १० हजारांची तर इतर दोन दुकानदारांवर अनुक्रमे दीड व दोन हजारांची दंडात्मक कारवाई केली. याशिवाय संचारबंदीचे उल्लंघन करून विनाकारण फिरणाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला.
मोकळ्या मैदानात दुरुपयोग करणारे मद्यपी रडारवर
शहरातील डी.एस. मैदान, टीव्ही टॉवर मैदान याशिवाय खडका चौफुलीवरील मैदानासह ठिकठिकाणच्या मोकळ्या जागांवर रात्रीच्या वेळेस मद्यपी काळोखाचा फायदा घेत नशा करीत असतात. यातूनच शहरात गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडलेले आहे. संचारबंदी लागू असतानादेखील काही टवाळखोर हे पोलिसांच्या रडारवर आहेत. त्यांच्यावरही पोलिसांनी कारवाई केली तर अनेकांनी पुन्हा पोलिसांना पाहून पोबारा केला.
खरेतर, नागरिकांनी कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेच्या अनुभवानंतर स्वयंस्फूर्तीने नियमांचे पालन काटेकोरपणे करणे गरजेचे आहे. मात्र काही व्यावसायिक व टवाळखोर नियमांचे उल्लंघन करताना दिसून येत आहे. अशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यापुढेही सक्तीने कारवाई करण्यात येईल, वेळप्रसंगी गुन्हे दाखल करण्यात येतील. अशी वेळ कुणीही येऊ देऊ नये, अशी अपेक्षा आहे.
- सोमनाथ वाघचौरे, डीवायएसपी, भुसावळ